मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:49 IST2025-12-25T15:47:41+5:302025-12-25T15:49:12+5:30
निवडणुकीची वेळ आहे. आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशी कुठलीही घोषणा करू शकत नव्हते ज्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होईल असं निरुपमांनी म्हटलं.

मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. त्यात उत्तर भारतीयांचे मते मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेत चढाओढ सुरू आहे. त्यातच शिंदेसेनेच्या उत्तर भारतीय ओबीसी विभागाची बैठक ठाण्यात झाली. या बैठकीतून मुंबई आणि आसपासच्या महानगरात राहणाऱ्या उत्तर भारतीयांमधील ओबीसी घटकांना महाराष्ट्रात ओबीसी दर्जा मिळावा अशी मागणी होत आहे. या बैठकीत उत्तर भारतीय ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक पाऊल उचलू असं आश्वासन दिल्याची माहिती शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, ठाण्यातील एका हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय ओबीसी समाजाची महापंचायत झाली. ही ऐतिहासिक घटना आहे. इतक्या मोठ्या संख्येने मुंबईत उत्तर भारतातून आलेले २२ ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आमचे ओबीसी लोक आपापल्या समाजाच्या चिंतेत आहेत. त्यांच्या सामाजिक संघटना आहेत परंतु संपूर्ण ओबीसी समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचे दु:ख एकच आहे आणि समस्या सारखीच आहे. या मागणीसाठी सामूहिक लढाई लढण्याचं आवाहन मी केले होते. याबाबत एकनाथ शिंदे यांना आवाहन दिले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या निमंत्रणावरून मुंबई आणि आसपासच्या उत्तर भारतीय समाजातील सर्व घटकांनी, नेत्यांनी इथे हजेरी लावली. या सर्वांची मागणी एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने ऐकली. त्यानंतर या समस्यांवर शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निवडणुकीची वेळ आहे. आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशी कुठलीही घोषणा करू शकत नव्हते ज्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होईल. मात्र संकेत दिलेत. ते सकारात्मक आहेत आणि पुढील निवडणुकीनंतर या विषयावर लढाई करून सरकारमध्ये पाठिंबा देऊन उत्तर भारतीय ओबीसी समाजाच्या मागणीवर कायमचा तोडगा काढला जाईल असा विश्वास शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केला.