लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचेशरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अखेर पूर्णविराम दिला.
रायगड येथे पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केले की, ‘आमच्याकडे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नाही, वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे आज तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही.’
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, पण हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असे सांगतानाच दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेचे आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले होते.
दर मंगळवारी अजित पवार गटाचे पदाधिकारी, आमदार यांची बैठक होते. या बैठकीतही आमदारांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र होते. काही आमदारांनी तर अजित पवार यांचे नेतृत्व आणि सुप्रिया सुळे यांनी राज्यात हस्तक्षेप न करता दिल्लीत लक्ष द्यावे, या गोष्टी मान्य असतील तर एकत्र यावे, असे काही मुद्देही उपस्थित केल्याचे सांगण्यात आले. अखेर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्ते आणि आमदारांमधील संभ्रम दूर केला.