Devendra Fadnavis Jayant Patil News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जवळचे असलेले अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांचा उल्लेख न करता त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दलचा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना जयंत पाटलांच्या पक्ष प्रवेशाबद्दल विचारलं गेलं.
जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाबद्दल फडणवीसांनी दिलं उत्तर
महाराष्ट्रभर प्रवेश होता आहेत. सांगलीतूनही अनेक प्रवेश होत आहेत. अजूनही काही प्रवेश सांगलीतून होतील, अपेक्षित आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे, तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही", असे उत्तर देतानाच हास्यकल्लोळ झाला.
कैलास गोरंट्यालाच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब
"कुणाचा प्रवेश करायचा आहे, कुणाचा प्रवेश करायचा नाही; याचा निर्णय भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष करतात. त्यांनी प्रवेश ठरवला की, आम्हाला तो मान्य असतो. चांगलं आहे की, कैलास गोरंट्याल जालन्यातील नेते आहेत. अनेक वर्ष आमदार राहिले आहेत. त्यांच्यासारखे जमिनीशी जुडलेले लोक भाजपमध्ये येत आहेत. भाजपचे अध्यक्ष त्यांना पक्षात आणत आहेत. त्यांचेही मी अभिनंदन करतो", असे फडणवीस म्हणाले.
अण्णासाहेब डांगेंबद्दल फडणवीस काय म्हणाले?
"टँकरमुक्त महाराष्ट्र कार्यक्रमाच्या काळात मला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. अण्णांचं स्थान पक्षात खूप मोठं होतं. गोपीनाथरावजीही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय घ्यायचे नाही. युतीचे सरकार असताना प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीआधी गोपीनाथराव अण्णांसोबत बैठक घ्यायचे आणि तिथेच निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जायचा", अशा आठवणी फडणवीसांनी सांगितल्या.
"अण्णा फार चांगले वक्ते आहेत. दुर्दैवाने त्या काळात काही गैरसमज झाले. त्यांचा स्वभाव थेट, परखड असल्याने त्यांनी थेट आणि परखड भूमिका घेतली. पण, अण्णा मी आजही आपल्याला सांगतो की, जेव्हा पक्षातून जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पक्षातील कार्यकर्त्यांना दुःख झालं. याचं शल्य गोपीनाथरावांनाही होते. कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे", असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.