माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार?

By अतुल कुलकर्णी | Updated: July 27, 2025 11:15 IST2025-07-27T11:14:17+5:302025-07-27T11:15:10+5:30

आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना आपण विश्वासाने कृषिमंत्री पद दिले.

will manikrao kokate send home or bring dhananjay munde back | माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार?

माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार?

अतुल कुलकर्णी , संपादक, मुंबई

प्रिय अजित दादा 

नमस्कार. 

आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना आपण विश्वासाने कृषिमंत्री पद दिले. त्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या विधानांमुळे लोक यापूर्वीची आपली सगळी विधाने विसरून गेले असतील. मागे केलेल्या ‘त्या’ एका विधानामुळे आपण कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापुढे दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेष केला होता. नाशिक जिल्ह्यात असे कुठले समाधीस्थळ आहे का? ज्याठिकाणी कोकाटे यांना आत्मक्लेष करायला लावून शुद्ध करून घेता येईल..? ज्या ज्या जिल्ह्यात आपले मंत्री आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यात असे एखादे आत्मक्लेष केंद्र उघडता येते का बघा. जेणेकरून आपल्या मंत्र्यांनी कसलेही विधान केले की, त्यांना त्या केंद्रात पाठवून आत्म्याची शुद्धी करून घेता येईल. आयडिया चांगली आहे ना... तुम्ही आमच्या संपर्कात राहात नाही म्हणून आम्ही चांगल्या ‘आयडियाची कल्पना’ देऊ शकत नाही. मग नाईलाजाने आम्हाला पत्र लिहावे लागते. असो.

शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा एक किस्सा एका अधिकाऱ्याने सांगितला. खरा खोटा माहिती नाही. पर्यावरण मंत्र्यांकडे सुनावणीसाठी ज्याची फाईल आधी येईल, त्याची सुनावणी आधी होईल, असा कायदा आहे. तो क्रम कोणालाही बदलता येत नाही. मात्र, रामदास कदम यांनी त्यांना हव्या त्या क्रमाने सुनावणी घेऊ, अशी भूमिका घेतली. त्यावर हे प्रकरण मुख्य सचिवांपर्यंत गेले. कदम यांनी ‘सरकार म्हणजे कोण?’ असा कळीचा प्रश्न उपस्थित केला होता. स्वाधीन क्षत्रिय मुख्य सचिव होते. त्यांनी ‘मंत्री म्हणजेच सरकार’, असे सांगितले. तेव्हा मी जर सरकार असेल तर मी सांगतो त्याच क्रमाने सुनावणी होईल, अशी भूमिका कदम यांनी घेतल्याचे मंत्रालयात सांगितले जाते... या प्रकरणाचे पुढे काय झाले माहिती नाही. हा संदर्भ एवढ्यासाठी की आपले लाडके कृषिमंत्री कोकाटे यांनी एक एक रुपया घेणारे सरकार भिकारी आहे, असे विधान केले. याचा अर्थ सरकार भिकारी म्हणजे मंत्री भिकारी आहेत असा काढायचा का? हा मूलभूत प्रश्न आमच्या ‘साैं’ना पडला आहे. कायद्यात उपमुख्यमंत्री पद असे कुठेही नमूद नाही. ते देखील मंत्रीच असतात. याचा अर्थ कोकाटे यांनी आपल्यालाही भिकारी अशी उपमा दिली असे म्हणायचे का..? विचार करून करून डोक्याचा फार भुगा पडला आहे. 

दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री बघा. ते असे भिकारी वगैरे काही म्हणत नाहीत. ते थेट फायटिंग करतात. विरोधी नेत्याला स्टॅम्प पेपरवर कुस्ती खेळायला येण्याचे आवाहन देतात. लुंगी बनियन घालून कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांना ठोकून काढतात. त्यांचे एक मंत्री नोटांची बॅग रूममध्ये ठेवून बनियन लुंगी गुंडाळून सिगरेट ओढत बसतात. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात. तेच मंत्री काही कोटींचा फ्लॅट ७० व्या मजल्यावर कसा घेतला, याचाही व्हिडिओ पोस्ट करतात. त्यांचे आणखी एक मंत्री आईच्या नावावर बारचा परवाना घेतात, असा आरोप विधान परिषदेत होतो. त्या बारमध्ये डान्सबार सुरू असल्याचे सभागृहात सांगितले जाते. त्यांच्या पक्षाचे बडे नेते ॲम्बुलन्समध्ये घोटाळा करतात, असे सकाळच्या भोंग्यावरून संजय राऊत सांगतात. इतके कर्तृत्ववान नेते, मंत्री आजूबाजूला असताना आपल्या मंत्र्यांनी त्यांच्याकडून काही आदर्श घेतला पाहिजे. शेवटी एकमेकांचे चांगले गुण घेऊनच माणसं आपापली प्रगती करत असतात. आपल्या मंत्र्यांनीही शिंदेसेनेच्या मंत्र्यांचे असे चांगले गुण घेतले पाहिजेत. 

परवा आपण बीड जिल्ह्यात गेला होतात. कार्यकर्ते एका रांगेत उभे नव्हते. थेट आपल्या हेलिकॉप्टरपर्यंत आले म्हणून आपण तिथल्या एसपीवर उगाच चिडचिड केली. कार्यकर्ते, पदाधिकारी एसपीला जुमानत नाहीत, तिथे ते बाकीच्यांना काय दाद देणार? एका रांगेत उभे राहून आपले स्वागत करायला ते काय पोलिस विभागात काम करतात का..? बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रयोगशाळा आहे. आपण बीडचे पालकमंत्री आहात.  तेथे जे काही सुरू आहे, त्याचा आपण अजूनही बंदोबस्त करू शकला नाहीत, असे भाजपचे नेते सांगत होते. आपली देवाभाऊची मैत्री आहे. बीड ऐवजी गडचिरोलीचे पालकमंत्री पद घेता आले तर बघा... नक्षलवाद्यांना हाताळणे सोपे असते... पण बीड जिल्ह्यातल्या आका आणि टोळ्यांना सांभाळणे कठीण आहे हे आपण बघतच असाल... 

जाता जाता : ‘‘शांततेच्या नावाखाली स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली अशांततेला उत्तेजना मिळू नये... केवळ बहुमत आहे म्हणून बेपर्वाई नसावी आणि बहुमत नाही म्हणून दांडगाई नसावी. ‘लोकांची भलाई हीच आपली कमाई’ अशी भावना दोघांकडेही असेल, तर काही सत्तारुढांची बेपर्वाई आणि काही विरोधकांची दांडगाई या गोष्टी कमी होऊन लोकशाहीची पुण्याई कृतार्थ बनेल...’’ असे बाळासाहेब भारदे म्हणाले होते. म्हणजे नेमके काय हे जरा विस्कटून सांगता का...

- तुमचाच, बाबूराव
 

Web Title: will manikrao kokate send home or bring dhananjay munde back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.