आता आमचं ठरलंय! मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवत फडणवीसांचा रोखठोक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 01:32 PM2022-04-25T13:32:04+5:302022-04-25T13:34:31+5:30

मनातला गैरसमज काढून टाका; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं

will fight continue our against thackeray government says bjp leader devendra fadnavis | आता आमचं ठरलंय! मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवत फडणवीसांचा रोखठोक इशारा

आता आमचं ठरलंय! मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवत फडणवीसांचा रोखठोक इशारा

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजपच्या नेत्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला थेट लक्ष्य केलं. केरळ, पश्चिम बंगालमध्ये आमचे कार्यकर्ते मारले गेले. मात्र तरीही आम्ही शांत बसलो नाही. हा तर महाराष्ट्र आहे. आम्ही गप्प बसू असं वाटेल, तर तो तुमचा गैरसमज आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारवर हल्ला चढवला.

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ३ मेपर्यंची मुदत दिली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित होते. त्याबद्दल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. गेल्या ४-५ दिवसांत घडलेल्या घटना, भाजप नेत्यांवरील हल्ले पाहता सरकारनं संवादासाठी जागा ठेवली आहे, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो नाही, असं फडणवीस म्हणाले.

हिटलरी प्रवृत्तीनं वागायचं असंच जर राज्य सरकारनं ठरवलं असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं आम्हाला वाटतं, अशा शब्दांत फडणवीसांनी भाजपची पुढील भूमिका सांगितली. गृहमंत्र्यांनी महत्त्वाच्या विषयावर बैठक बोलावली. पण त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच उपस्थित नव्हते. मग ती बैठक केवळ टाईमपाससाठी होती का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

विरोधकांना जिवानिशी संपवायचं, हीच प्रवृत्ती असेल तर आम्ही संघर्ष करू. किरीट सोमय्यांना केंद्राची झेड दर्जाची सुरक्षा आहे. पण पोलिसांसमोर त्यांच्यावर हल्ला झाला. मोहित कंबोज यांचं मॉब लिन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला. एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पोलखोल सभा, रथांवर हल्ले झाले. मात्र कितीही हल्ले झाले तरीही आम्ही गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील आमची लढाई सुरूच राहील, असं म्हणत फडणवीसांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Web Title: will fight continue our against thackeray government says bjp leader devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.