Arvind Sawant: राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना एका कथित बैठकीने राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या नऊपैकी आठ खासदारांशी गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. या वृत्तामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता पसरली असून, उरलेले खासदारही शिंदेंच्या गोटात सामील होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र ठाकरे गटाच्या सर्वच खासदारांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका ठिकाणी ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे म्हटलं जात आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर २ खासदार व्हिडिओ कॉलद्वारे जोडले गेल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेंही उपस्थित असल्याचे म्हटलं जात आहे. या चर्चेत खासदारांना शिंदे गटात सामिल होण्याची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण होते 'त्या' यादीत?
या चर्चेत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, आणि राजाभाऊ वाजे या खासदारांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आणखी एक खासदार व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीत सहभागी झाल्याचे बोलले जात आहे.
अरविंद सावंत यांचा संताप; कॅमेऱ्यासमोरच लिहून दिला 'निष्ठेचा पुरावा'
या वृत्ताने दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत माध्यमांवर प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यांनी या बातम्या फेटाळूल लावत माध्यमांवर आपला रोष व्यक्त केला. हिंमत असेल तर तिथे बैठकीला कोण गेलं याचे फोटो छापून दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी दिले. इतकेच नव्हे तर, आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी सावंत यांनी एका कागदावर आपण कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असे लिहून ते कॅमेऱ्यासमोर दाखवले. यावेळी त्यांनी सांगितले की, २४ एप्रिल रोजी कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कुणाचे या प्रश्नावर सुनावणी आहे. त्याचवेळी अशा बातम्या सोडायच्या आणि ठाकरे गटाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी ही अफवा पसरवली जात आहे.
आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार - अरविंद सावंत
"यासंदर्भात मला ओमराजे निंबाळकर यांचा फोन आला, ते संतापले होते. मी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अशा कुठल्या बैठकीला नव्हतो असे त्यांनी सांगितलं. इतक्या खोट्या बातम्या छापण्यात आल्या. त्या विरोधात मी कोर्टात कारवाईसाठी जाणार आहेय त्यांच्यावरती मी बदनामीच्या खटला दाखल करणार आहे. आमच्या चारित्र्यावर हा शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहोत. प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे. हिम्मत असेल तर तिथे बैठकीला कोण गेलं याचे फोटो छापून दाखवा. २४ एप्रिल रोजी कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कुणाचे या प्रश्नावर सुनावणी आहे. त्याचवेळी अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं की आता इकडे काही शिल्लक राहिलेलं नाही आमच्याकडे सर्वच आहोत," असं अरविंद सावंत म्हणाले.
जिथे एकनाथ शिंदे असतात तिथे जात नाही
"माझे सगळे फोन नंबर तपासून पहा. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कधीही संपर्क झालेला नाही. कुठल्याही कार्यक्रमात एकनाथ शिंदेंसोबत स्टेजवर गेलो नाही. जिथे जिथे ते आहेत तिथे मी जात नाही. जगेन तर उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच," असंही अरविंद सावंत म्हणाले.
Web Summary : Arvind Sawant refuted rumors of meeting Eknath Shinde and defecting. He challenged media to prove his presence and publicly affirmed his unwavering support for Uddhav Thackeray, suspecting political conspiracy ahead of a crucial court hearing.
Web Summary : अरविंद सावंत ने एकनाथ शिंदे से मुलाकात और दल-बदल की अफवाहों का खंडन किया। उन्होंने मीडिया को उनकी उपस्थिति साबित करने की चुनौती दी और उद्धव ठाकरे के लिए अपना अटूट समर्थन सार्वजनिक रूप से दोहराया, उन्हें महत्वपूर्ण अदालती सुनवाई से पहले राजनीतिक साजिश का संदेह है।