BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:03 IST2025-12-20T17:02:19+5:302025-12-20T17:03:08+5:30
"मी मुंबईच्या जनतेला निवेदन करतो की, काँग्रेसला एकदा संधी द्या. आम्ही..."

BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजला असून गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष कंबरकसून कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांची जुळवा-जुळवही सुरू आहे. दरम्यान आज, काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवेल, अशी घोषणा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गेल्या चार वर्षांपासून झालेली नाही. सुप्रिम कोर्टामुळे निवडणूक होत आहे. सरकारच थेट महानगरपालिका चालवत होतं. प्रत्येक गोष्टीत सरकार हस्तक्षेप करायचे. या लोकांची निवडणूक घेण्याची इच्छा नव्हती, निवडणूक प्रणालीचा स्वीकर करण्याची यांची इच्छा नव्हती, असा आरोपही चेन्निथला यांनी यावेळी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
चेन्निथला म्हणाले, "आम्ही वर्षा गायकवाड आणि आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात, प्रदुषणाविरोधात, रुग्णालयांतील परिस्थिती संदर्भात, भ्रष्टाचारासंदर्भात, आंदोलने केली आहेत. गेल्या काही दिवसांत महानगरपालिकेत काय झाले आणि काय नाही झाले, हे जेनतेला माहीत आहे. सर्वसामान्यांना आजही त्रासांना सामोरे जावे लाग आहे. सर्वसामान्यांना, गरिबांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. एवढा भष्टाचार वाढला आहे."
"सर्वोच्च न्यायालयाने व्हरडिक्ट दिले म्हणून..." -
"गेल्या चार वर्षांपासून निवडणूक झालेली नाही. सुप्रिम कोर्टामुळे निवडणूक होत आहे. निवडणुक का झाली नाही? सरकारच थेट महानगरपालिका चालवत होतं. प्रत्येक गोष्टीत सरकार हस्तक्षेप करायचे. आपल्या संविधानातही अॅमेंडमेंड झाली आहे. तरीही या लोकांची निवडणूक घेण्याची इच्छा नव्हती, निवडणूक प्रणालीचा स्वीकर करण्याची यांची इच्छा नव्हती. यांना थेट मुंबई महानगरपालिका चालवायची हती," असा आरोपही काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी यावेळी केला. तसेच, "जर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर, येणारी पाच वर्षेही अशीच गेली असती. यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयाने व्हरडिक्ट दिले म्हणून ही निवडणूक होत आहे," असेही चन्निथला म्हणाले.
स्वबळाची घोषणा -
चेन्निथला पुढे म्हणाले, "यामुळेच काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, आम्ही भाजप विरोधात लढणार, आम्ही ठाकरेंच्या शिवसेने विरोधातही लढणार. तसेच, खऱ्या देशभक्तांनी आणि सेक्यूलर लोकांनी एकत्रितपणे काँग्रेस सोबत यायला हवे. आम्ही ही महानगरपालिका चांगल्या पद्धतीने चालवण्याचे काम आम्ही करू. आम्ही आमचा जाहीरनामा आपल्यासमोर सादर करू." तसेच, मी मुंबईच्या जनतेला निवेदन करतो की, काँग्रेसला एकदा संधी द्या. आम्ही महानगरपालिका चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न करू, असे आवाहनही चेन्निथला यांनी यावेळी केले.
भाजपचे धार्मिक राजकारण मुंबईकर नाकारातील - वर्षां गायकवाड
निवडणुका आल्या की, भाजपचे धार्मिक राजकारण सुरू होते. एकीकडे अमित साटम म्हणणार नवाब मलिक नको त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा करणार. नवाब मलिक नको पण यांची मुलगी सना मलिक भाजप सरकारला मतदान करणार! ज्या तऱ्हेने भाजपचा हा दुटप्पीपणा आहे, भाजपचे धार्मिक राजकारण आहे हे मुंबईच्या जनतेला दिसत आहे. सत्तेत राहायचे,फायदा घ्यायचा आणि निवडणुका आल्या की धार्मिक राजकारण करायचे. मुंबईकर यात फसणार नाही.
मुंबईकर रस्ते, ट्रॅफिक, शुद्ध पाणी,हवा या नागरी प्रश्नांवर मतदान करतील, असे गायकवाड म्हणाल्या.
मात्र वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य छोट्या पक्षांचे प्रतिनिधी आम्हाला येऊन भेटत आहे असे सूचक उद्गार वर्षा गायकवाड यांनी काढले त्यामुळे वंचित साठी काँग्रेसचे दरवाजे उघडे असल्याचे किंबहुना या दोन्ही पक्षात युती होण्याची शक्यता अजूनही मावळली नसल्याचे संकेत मिळत आहेत