Join us  

मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:53 AM

वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेस नेते नाराज झाले आहेत.

Mumbai Congress ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. लोकसभा उमदेवारीवरून मिलिंद देवरा पक्षापासून वेगळे झाले. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून काँग्रेसला घरचा अहेर दिल्याने संजय निरूपम यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली. तीन मोठे नेते दुरावल्याने मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशातच आता वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेस नेते नसीम खान हेदेखील नाराज झाले आहेत. खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

"काँग्रेसने मला महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पक्षाच्या प्रचार-प्रसाराचं काम दिलं होतं. पक्षाचं हे काम मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलं. तसंच मला मागील तीन महिन्यांपूर्वी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मी काम सुरू केलं होतं. मात्र आता अचानक वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयावर मुस्लीम समाज प्रचंड नाराज झाला आहे. मीदेखील काँग्रेसवर नाराज आहे. तुम्हाला निवडणुकीत मुस्लीम समाजाची मतं हवी आहेत, मग प्रतिनिधित्व का नको?" असा सवाल नसीम खान यांनी काँग्रेस नेतृत्वाला विचारला आहे.

दरम्यान, नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश येणार की अन्य काही नेत्यांप्रमाणे तेही दुसरा राजकीय पर्याय स्वीकारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्षा गायकवाड यांनीही व्यक्त केली होती नाराजी

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने नुकतीच वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन तिढा सुरू असल्याची चर्चा सुरू होती. यात मुंबई शहरातील विविध मतदारसंघ आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होती. काँग्रेसच्या वर्षा गायकवाडही उमेदवारीवरुन नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आता वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४मुंबई उत्तर मध्यवर्षा गायकवाड