मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार कायम राहणार?
By यदू जोशी | Updated: July 1, 2025 09:55 IST2025-07-01T09:55:41+5:302025-07-01T09:55:58+5:30
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार हेच महापालिका निवडणुकीपर्यंत कायम राहणार, असे संकेत मिळाले आहेत.

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार कायम राहणार?
यदु जोशी
मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार हेच महापालिका निवडणुकीपर्यंत कायम राहणार, असे संकेत मिळाले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आली होती. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सोमवारी निवडणुकीसाठीची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली.
प्रदेश भाजपचे अध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे गेले. केंद्रीय भाजपने नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना निवडणूक अधिकारी म्हणून नेमले, त्यांनी सोमवारी मुंबईत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष निवडण्यासाठी अशीच प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने अद्याप मुंबईसाठी कोणालाही निरीक्षक म्हणून नेमलेले नाही. अन्य काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मुंबईबाबत कोणताही निर्णय भाजप नेतृत्वाने घेतलेला नाही.
मराठी-हिंदी वाद निर्माण झाल्यानंतर मराठी आणि मराठा चेहरा म्हणून शेलार यांच्याकडेच किमान महापालिका निवडणुकीपर्यंत नेतृत्व कायम ठेवावे, असा विचार दिल्लीत सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकीनंतर नवीन अध्यक्ष नेमण्याबाबत त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा मंगलप्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले होते. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष तेव्हा आशिष शेलार मुंबई अध्यक्ष झाले होते, पण रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होत असताना मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय झालेला नाही.
व्यवस्थापन समितीत कोण?
अध्यक्ष - ॲड. आशिष शेलार, सदस्य - किरीट सोमय्या, भाई गिरकर, प्रकाश मेहता, मधू चव्हाण, राज पुरोहित, आ. कालिदास कोळंबकर, ॲड. पराग अळवणी, आ. राम कदम, आ. पराग शाह, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन, आ. श्रीकांत भारतीय, जयप्रकाश ठाकूर, माधव भंडारी, हाजी अराफत शेख, राणी द्विवेदी, संजय पांडे, दिलीप पटेल, अरुण देव.
शेलार दोन समित्यांचे अध्यक्ष
महापालिकांप्रमाणेच राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक व्यवस्थापन आणि राज्य निवडणूक संचालन समित्या स्थापन होणे अपेक्षित असताना बावनकुळे यांनी त्या जाहीर केल्या नाहीत. त्यात, नवीन अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण आल्यानंतर त्यांनी या समित्यांची घोषणा करावी, असे अपेक्षित केले गेले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मात्र शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समित्या तयार करण्यात आल्या आहेत. याचा अर्थही शेलार हेच महापालिका निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदी कायम राहणार, असा घेतला जात आहे.