Join us

...म्हणून शिवसेनेने अविश्वास प्रस्तावावेळी मतदान केलं नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 06:29 IST

अविश्वास प्रस्तावावर शिवसेना तटस्थ का राहिली, यावरून सुरू असलेल्या चर्चेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.

मुंबईः केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर शिवसेना तटस्थ का राहिली, त्यांनी चर्चेत भाग का घेतला नाही, कुणाच्याच बाजूने मतदान का केलं नाही, यावरून सुरू असलेल्या चर्चेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. 

'सरकारला मतदान करायचंच असतं तर इतके दिवस आम्ही सरकारच्या निर्णयावर हल्ला का चढवला असता? विश्वासदर्शक-अविश्वासदर्शक हा जो काही प्रकार आहे... नेमका कुणी कोणावर विश्वास आणि अविश्वास दाखवायचा? आम्ही विरोधी पक्षात जाऊन सरकारविरोधात मतदान करायचे का? विरोधी पक्षाने तरी असं काय केलं आहे? शिवसेना केंद्र आणि राज्याच्या सत्तेत सामील आहे. पण, सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना करतेय. आम्ही कोणत्याही एका पक्षाचे मित्र नाही, तर भारतीय जनतेचे मित्र आहोत, त्यामुळे जनतेच्या हिताच्या नसलेल्या गोष्टींना विरोध करणारच', अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी ठामपणे मांडली आहे.  

उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीचा पहिला भाग आज 'सामना'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यात राष्ट्रीय राजकारण, मोदी सरकारची धोरणं, भाजपाच्या भूमिका, शिवस्मारक, शेतकऱ्यांचं आंदोलन यासारख्या विषयांवर उद्धव यांनी परखड टिप्पणी केली आहे. 'सावजाची शिकार मीच करीन, आता सावज दमलंय, त्याला बंदुकीची गरजही लागणार नाही', अशा शब्दांत त्यांनी भाजपाला स्वबळावर पराभूत करण्याचा निर्धारच व्यक्त केलाय. 

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतीत ठळक मुद्देः 

>> माझ्या मनात कधीच पाप नसतं. मी जे काही बोलतो ते तळमळीने बोलतो. कुणाचंही चांगलं व्हावं यासाठीच बोलतो. कुणाचं वाईट व्हावं असा कधीही प्रयत्न केला नाही. ती शिकवण किंवा तो संस्कार माझ्यावर नाही. 

>> शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे. कोणत्याही एका पक्षाचा मित्र नाही. म्हणूनच वेळोवेळी एखादी गोष्ट आम्हाला पटली नाही किंवा पटणार नाही, तेव्हा आम्ही बोलतोय. आम्ही सरकारच्या एखाद्या भूमिकेला वा धोरणाला विरोध केला तो देशाच्या, जनतेच्या हितासाठीच. 

>> विरोधी पक्ष काय करतोय ते लोकांनी पाहिलंय. आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत. साथ दिली तीसुद्धा उघडपणे आणि विरोध केला तोसुद्धा उघडपणेच. 

>> गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी देशात एकूणच जो काही कारभार चालला होता, (अर्थात, आजही काही वेगळा आहे असं नाही) त्यात कुणीतरी एक बदल करेल अशी देशातील जनतेप्रमाणे आम्हालाही आशा होती. चांगल्या गोष्टी अजिबातच झाल्या नाहीत असे नाही. पण काही गोष्टी गोरगरीब जनतेच्या हिताच्या नाहीत, तिथे सत्तेत असलो तरी आम्ही विरोध करणारच. 

>> आज जे सगळे मिळून बोलताहेत, तीच भूमिका शिवसेनेने आधीच मांडली होती. मग नोटाबंदी असेल, जीएसटी असेल, भूसंपादन कायद्याबद्दल असेल, जीएसटी असेल. जेव्हा शिवसेना जनतेच्या विषयांवर आवाज उठवत होती, तेव्हा विरोधी पक्ष कुठे होते? 

>> माझ्यावर माँ आणि साहेबांचे संस्कार आहेत. आजोबांच्याही अनुभवाच्या गोष्टी आहेत. आज तशी विश्वासाला जागणारी, शब्द पाळणारी पिढी आहे का? तोंडदेखलं तुम्हाला बरं वाटावं म्हणून एखादी गोष्ट बोलणं आणि तुमची पाठ वळल्यावर पाठीत वार करणं ही जर नीती असेल तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा आणि अविश्वास तरी कुणावर दाखवायचा?

>> पाठीत वार आमच्या नाही, तर जनतेच्या आहे. आज सरकारविरोधात आलेला अविश्वास ठराव तेलगू देसम पार्टीने आणलाय. तो एनडीएचा घटक पक्ष होता. एका मित्रानेच दुसऱ्या मित्राबाबत अविश्वास दाखवावा, असं कदाचित आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असेल. 

टॅग्स :अविश्वास ठरावउद्धव ठाकरेशिवसेनानरेंद्र मोदीभाजपा