धनंजय मुंडे यांचा राजीनामा का नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:07 IST2025-01-19T07:06:19+5:302025-01-19T07:07:01+5:30
आ. ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा का नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल
मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंडेंना संरक्षण आहे का?, असा सवाल उद्धवसेनेचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला.
आ. ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक जण अजूनही फरार आहे. आरोपी वाल्मीक कराड याचे अजित पवार गटाचे मंत्री मुंडे यांच्याशी संबंध आहेत, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा घ्यायला हवा, असे आ. आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण आहे...
मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणी रोखले आहे का? यामागे काही राजकीय दबाव आहे की, वेगळा युतीधर्म आहे, हे त्यांनी सांगायला हवे. राजीनामा घेत नाहीत, याचाच अर्थ त्यांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण आहे. नवीन सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री राज्याला चांगल्या मार्गावर नेतील, भ्रष्ट नेत्यांना बाजूला सारतील अशी अपेक्षा केली होती. शहरात, राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. हीट अँड रनचे पुढे काय झाले ते माहीत नाही, अशी टीकाही आ. ठाकरे यांनी केली.