Join us

तुमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता; नवाब मलिकांचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:28 IST

दोन वर्षापुर्वी शिवस्वराज्य यात्रेतील रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्र फोटो काढण्यासाठी जवळ आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा केली.

मुंबई: मी छत्रपती शिवाजी महाराज ती जय बोलतोय तरी देखील भाजपाकडून माझा व्हिडिओ चूकीच्या पद्धतीने व्हायरल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्यासोबत केली होती. त्याचप्रमाणे तुमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता असा सवाल नवाब मलिक यांनी भाजपाला विचारला आहे. नवाब मलिक यांचा शिवस्वराज्य यात्रेमधील एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

दोन वर्षापुर्वी शिवस्वराज्य यात्रेतील रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्र फोटो काढण्यासाठी जवळ आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा केली. त्यावेळी सर्वजण जय म्हणाले मी सुद्धा जय म्हणालो. फक्त हात वरती केला नाही याचा भाजपावाले वेगळा प्रचार करत आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले. मलिकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली होती. 

मी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली आणि आजही देत आहे. शासनाच्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून सुरुवात केली होती याची आठवण नवाब मलिक यांनी भाजपाला करुन दिली आहे.

रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी या व्हिडिओ पोस्ट करुन नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

टॅग्स :नवाब मलिकछत्रपती शिवाजी महाराजराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी