Join us  

भाजपला राज ठाकरे यांची गरज का भासली, मराठी मतांच्या विभाजनासाठीही उपयोग?

By यदू जोशी | Published: March 20, 2024 5:50 AM

नवे समीकरण: ठाकरेंना पर्याय ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला का गरज भासली? उद्धव ठाकरेंना पर्याय आणि मराठी मतांचे विभाजन, हे उद्दिष्ट भाजपने ठेवले असल्याचे स्पष्ट दिसते. आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी राज यांनाही भाजपची गरज होती. त्यातून भाजप-मनसे युतीचा परस्पर सामंजस्य करार करण्याचे पक्के झाले आहे.

पुणे, नाशिक महापालिकेत सत्ता, १३ आमदार, ठाण्यासह इतर काही शहरांमध्ये असलेले अस्तित्व असे मनसेचे एकेकाळी वैभव होते. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांत ते ओसरले. आता भाजपच्या साथीने राज पुन्हा प्रभाव निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले. मात्र, ठाकरे ब्रँड उद्धव यांच्याकडेच राहिला. या ब्रँडला धक्का द्यायचा तर शिंदेंची साथ पुरेशी नाही, तर एक ठाकरेही लागणार हे लक्षात आल्यावर भाजपने राज यांच्यासमोर मैत्रीचा हात केला, असे मानले जाते.

शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता

एकनाथ शिंदे भाजपच्या साथीने मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादीलाही भाजपने सोबत घेतल्याने शिवसेनेचा महायुतीत संकोच झाला. आता मनसेमुळे  आणखी संकोच होऊ शकतो. मुंबईमध्ये राज यांना भाजप अधिक महत्त्व देईल, या शंकेने शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता असल्याचे मानले जाते.

भाजपला काय फायदे? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मते खेचता येतील, प्रचारात उद्धव यांना उत्तर देण्यासाठी राज यांच्या शैलीचा फायदा होईल. जाणकारांच्या मते राज यांना सोबत घेताना भाजपला शिंदेंच्या सेनेला न दुखावता संतुलन साधावे लागेल. राज पहिल्यांदाच युती करत असल्याने युतीधर्म पाळण्यात ते किती यशस्वी होतील हा प्रश्न आहेच.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४राज ठाकरेअमित शाहभाजपामनसे