"विधिमंडळात स्वतंत्र मतदारसंघ तरीही शिक्षकांना पक्षाचे काम का करू देत नाही?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:26 IST2025-02-11T05:25:34+5:302025-02-11T05:26:13+5:30
विधान परिषदेतील मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले होते

"विधिमंडळात स्वतंत्र मतदारसंघ तरीही शिक्षकांना पक्षाचे काम का करू देत नाही?"
मुंबई - प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहे. निवडणूक यंत्रणेचे काम त्यांच्याकडून करून घेतले जाते. मनानुसार ते मत देऊ शकतात; पण पक्षाचे काम करू शकत नाहीत. विधिमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असतानाही त्यांना पक्षाचे काम करायला परवानगी का दिली जात नाही, असा सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात उपस्थित केला.
विधान परिषदेतील मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले होते. अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. सरकारने शिक्षकांचे ऋण लक्षात ठेवले तर त्यांना मागण्या करण्याची वेळ येणार नाही. पण, सरकार कान बंद करून बसले आहे. शिक्षकांची कंत्राटदाराद्वारे भरती होत असून, हे कंत्राटदार कोण आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली.
लाडकी बहीण योजनेमधून ५ लाख नावे वगळली, १ रुपयात पीकविमा योजना बंद केली. आता शिवभोजन योजना बंद करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांना सांगा की हे सरकार बदलावेच लागेल, असे ठाकरे म्हणाले.
गळा धरावा असे आजकाल अनेकजण दिसतात !
कुंभमेळ्यात अनेकजण डुबकी मारायला जात आहेत. पण, इकडे पीओपी मूर्तींचे विसर्जन करू देत नाहीत. पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होते मान्य आहे, पण आदल्या दिवशी विसर्जन न करण्याचे आदेश काढले गेले. त्यामुळे अनेक मूर्तींचे विसर्जन झाले नाही. मूर्तींचे विसर्जन करू न देणारे हे कसले हिंदुत्व? ज्यांचे पाय धरावे, ज्यांच्या गळ्यात हार घालावे असे कुणी दिसत नाही. मात्र, गळे धरावे असे अनेक दिसतात, असा टोला त्यांनी लगावला.