"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:03 IST2025-07-18T17:02:35+5:302025-07-18T17:03:21+5:30
Devendra Fadnavis Latest Speech: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि मराठी माणूस या मुद्द्यावर बोलताना विधानसभेत रोखठोक भूमिका मांडली.

"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा मुद्दा विरोधकांकडून सातत्याने मांडला जातो. याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावून सांगितले की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. कुणाचा बाप आला, बापाचा बाप आला, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील", अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुंबईच्या विकासाबद्दल त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "प्रत्येकवेळी वर्ष-दीड वर्षांनी आलेल्यांना मुंबई बदलेली पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा कुणाच्या वाट्याला येऊ नये असा प्रयत्न आपण करतो. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे, मुंबईवर. त्यांनी काय अनुभवलं', असे म्हणत देवेंद्र फडणवीस ती कविता वाचून दाखवली.
"याच कवितेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची नांदी केलेली आहे. ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की, चार महिन्यांनंतर भाषणं सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे", असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.
मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि राहील
फडणवीस पुढे म्हणाले की, "आताच सांगतो. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. कुणाचा बाप... बापाचा बाप... त्याचा बाप... त्याचा बाप... त्याचा आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे. मुंबई महाराष्ट्राचीच राहील आणि हजारो पिढ्या राहील. या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील", असे फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.