मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?; राजू पाटील म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 09:10 IST2019-10-30T08:53:59+5:302019-10-30T09:10:12+5:30
सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत.

मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?; राजू पाटील म्हणतात...
मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. त्यातच मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांना तुमचा पाठिंबा कोणाला असणार असं विचारले असता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरुन त्यांच्या आदेशाप्रमाणे योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरेंच्या मनसेने राज्यात 100 जागा लढविल्या. मात्र, मनसेच्या इंजीनने कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी सेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव करत राज्यात एकमेव जागा मिळवली आहे. शिवसेनेला थोड्या मतांनी पराभवाची धूळ खावी लागली होती.
राजू पाटील यांचा 2014 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यंदा विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागली. अत्यंत कमी दिवसांत त्यांनी हायटेक प्रचार केला. सोशल मीडियावर ते प्रभावी ठरले. बदल हवा आहे, अशी त्यांच्या प्रचाराची टॅगलाइन होती. कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी त्यांना कौल दिला होता.