कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 10:46 IST2025-09-13T10:45:41+5:302025-09-13T10:46:29+5:30

आता मोहित कंबोज यांनी ‘संन्यास’ घेण्याची केलेली कथित घोषणा ही राजकीय सनसनाटी ठरलीय; पण ते खरेच संन्यास घेणार की प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट आहे?

Whisper: Is Mohit Kamboj really a renunciation or a stunt for fame? 'High people, high preferences', but... | कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

भाजपचे युवा नेते मोहित कंबोज यांनी वयाच्या केवळ ४१ व्या वर्षी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केल्याची चर्चा आहे. कंबोज हे २००२ मध्ये मुंबईत  आले. त्यानंतर त्यांनी राजकारणात  ‘वेगळे’ स्थान निर्माण केले. पक्षात शेकडो कार्यकर्ते अनेक वर्षे काम करून महापालिकेची उमेदवारी मिळवू शकले नाहीत.

कंबोज यांनी मुंबई भाजपचे उपाध्यक्षपद आणि विधानसभा निवडणूक उमेदवारी मिळवली. आता त्यांनी ‘संन्यास’ घेण्याची केलेली कथित घोषणा ही राजकीय सनसनाटी ठरलीय; पण ते खरेच संन्यास घेणार की प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट आहे, असा प्रश्न त्यांच्याच पक्षातील अनेकांना पडला आहे.  

‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...

टेस्लाची महागडी मोटार खरेदी केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चर्चेत व पर्यायाने वादात सापडले. घोडबंदर रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या अनेकांनी त्यांच्या या मोटार खरेदीची कडक शब्दांत हजेरी घेतली. तर, या खड्ड्यांविरोधात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले.

‘नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदररोडवासीय फसला’, अशा घोषणा देण्यास आंदोलक विसरले नाहीत. यापूर्वी   ‘व्हर्टू’ कंपनीचे महागडे मोबाइल आले होते तेव्हा सरनाईक यांनी   लिलावात खरेदी केलेला असा मोबाइल अजित पवार यांना भेट दिला होता. यावरून दोघांवरही  टीका झाल्याने अखेर त्यांनी तो  मंदिराला दान केला होता, हे अनेकांच्या स्मरणात असेलच. 

भिवंडीतून एल्गार, पण नवी मुंबई शांत

नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच त्याला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतील की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळेच भिवंडीचे खा. सुरेश म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

दिबांच्या नावासाठी ते  रॅली काढणार आहेत. तर दुसरीकडे रायगड, नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी या विषयावर   मौन धारण केले आहे. दिबा पाटील यांच्या आशीवार्दाने अनेकांची राजकीय कारकिर्द घडली. अशा वेळी त्यांची  नामकरणाबाबत असलेली बोटचेपी भूमिका जनमानसात चर्चेचा विषय ठरली असेल तर नवल ते काय?

...मग, जाहिरात कशाला करता?

मनोरंजन विश्वातील तारे-तारका जाहिरातींद्वारे कोट्यवधी रुपये कमावतात, पण कित्येकदा काही जाहिरातबाजीमुळे त्यांना तोंडघशी पडावे लागते. याचा अनुभव सध्या अक्षय कुमार घेत आहे. गुटख्याबाबत प्रश्न विचारताच ‘गुटखा खाता कामा नये’, असे अक्षयने उत्तर दिले.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून नेटकरी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करीत आहेत. एकाने ‘आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या पदार्थांची अभिनेते जाहिरात का करतात?’, असा सवाल केला, तर दुसऱ्याने  ‘बोलो जुबां केसरी...’ असे ते का म्हणतात, अशीही टर उडवली आहे. अन्य प्रतिक्रिया  संताप व्यक्त करणाऱ्या आहेत.

‘खाकी’चा रंग उतरला की काय?

सिडकोच्या दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात नियुक्तीवर असताना गुन्हेगारांना खाक्या दाखवला होता. यामुळे त्यांच्याकडून सिडकोतील भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट केली जातील, अशी अपेक्षा होती.

प्रत्यक्षात ते चमक दाखवू शकले नाहीत. त्यामुळे या विभागाची सूत्रे हाती असूनही त्यांचे हात बांधले की काय, अशी चर्चा रंगत आहे. वाईटाचा नेहमी तिरस्कार करून चांगले ते आत्मसात करायचे असा त्यांचा स्वभाव. पण, या भ्रष्टाचारावर ते जरब बसविण्यात कमी पडल्याचे दिसते. त्यामुळे  त्यांच्या ‘खाकी’चा रंग उतरला की काय अशी कुजबुज आहे.  

अहंकार दहनासाठी ‘बिभीषण’ कोण?

नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्यातही मी शत-प्रतिशत भाजपची सत्ता आणू शकतो. त्यासाठी आपल्याला ठाण्यातील  नेत्याच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, असे वक्तव्य भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. 

त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांप्रमाणेच नवी मुंबईतील त्यांचे चाहते सुखावले खरे पण, रामायणात श्रीरामाच्या मदतीला रावणाचा बंधू बिभीषण धावून आला होता. यामुळे नाईक यांना अभिप्रेत असलेल्या अहंकार दहनासाठी त्यांना ठाण्यात बिभीषण शोधावा लागेल. तरच त्यांना अभिप्रेत  घवघवीत यश साध्य होईल, अशी कुजबुज कानी येत आहे.  

Web Title: Whisper: Is Mohit Kamboj really a renunciation or a stunt for fame? 'High people, high preferences', but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.