'...पण स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 08:18 AM2020-02-27T08:18:55+5:302020-02-27T08:23:36+5:30

BJP: सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय?

where was the BJP or the 'RSS' in the freedom struggle? Shiv Sena Asked Question pnm | '...पण स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?' 

'...पण स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?' 

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहेसावरकरांची ‘ढाल’ करून भाजपा हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहेसावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वादंग निर्माण झाला आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपा आणि संघाला लगावला आहे. 

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ‘‘तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.’’ ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगतेय. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱया संघटना 2002 पर्यंत ‘राष्ट्रध्वज’ फडकवायला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे, पण भगव्याच्या बरोबरीने ‘तिरंगा’ही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद आहे असं शिवसेनेने सांगितले आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. 
  • भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकर हे भाषाप्रभूसुद्धा होते. मराठी भाषेत ‘शुद्धी’चे प्रयोग त्यांनी केले. वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. 
  • भाजपतर्फे विधानसभेत सावरकर गौरवाचा प्रस्ताव आणणे व त्यावर चर्चा करणे ही ‘कोंडी’ करण्याची योजना कशी होऊ शकते? वीर सावरकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे. वीर सावरकर हे त्याग, तत्त्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळय़ांनाच पुरून उरले व हयातभर त्यांचे स्थान अढळ राहिले. 
  • सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? भाजप म्हणते वीर सावरकरांच्या विषयावर कोंडी करू. जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये. 
  • महाराष्ट्रात सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने वीर सावरकरांचा काय सन्मान राखला यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत. कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का जाहीर केला नाही? यावर महाराष्ट्रातील हे नव सावरकरप्रेमी काही प्रकाश टाकणार आहेत काय? 
  • महाराष्ट्राच्या विधानसभेने ठराव करावा वगैरे मागणी ठीक आहे, पण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याविषयी दोन पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवली होती. त्याचे पुढे काय झाले? त्या पत्रांची दखल केंद्राने घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचाही अपमान आहे!
  • वीर सावरकर हे अंदमानातून सुटल्यावर रत्नागिरीत सामाजिक कार्य करीत राहिले. देशभरातील अनेक प्रमुख लोक त्यांना तेथे येऊन भेटले. त्यात महात्मा गांधींपासून डॉ. हेडगेवारांपर्यंत पुढारी होते. वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांच्यात जी चर्चा झाली त्याचा तपशील महाराष्ट्रातील ‘नव सावरकर भक्तां’नी तपासून पाहिला पाहिजे. 
  • वीर सावरकरांचे कार्य, राजकीय विचार भूमिकांच्या पलीकडचे होते. भारतीय जनता पक्षाला सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, गोमातेसंदर्भातील परखड विचार पेलवणारे आहेत काय? भाजपच्या पुढाऱयांनी जाहीर केले आहे की, ‘माझी जन्मठेप’ या आत्मकथेचे आम्ही जाहीर वाचन करू! भाजपला इतके कष्ट घेण्याचे कारण नाही.
     

Web Title: where was the BJP or the 'RSS' in the freedom struggle? Shiv Sena Asked Question pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.