हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:21 IST2025-12-03T11:20:28+5:302025-12-03T11:21:20+5:30

Mumbai Air Pollution aqi: येत्या सहा ते ७ महिन्यांत हा प्लॅटफॉर्म कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या प्रदूषण मोजण्यासाठी २८ निरीक्षण केंद्रे असून ती सीपीसीबीशी (सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड) जोडलेली आहेत.

Where is the air, how bad is it in mumbai? Accurate information will be available; BMC to implement 'Manas' initiative to measure air quality | हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार

हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार

मुंबई : शहरात हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे. आयआयटी कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मानस (मुंबई एअर नेटवर्क फॉर ॲडव्हान्स सायन्सेस) असे या उपक्रमाचे नाव असून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची रिअल टाइम माहिती या माध्यमातून उपलब्ध होईल.

येत्या सहा ते ७ महिन्यांत हा प्लॅटफॉर्म कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या प्रदूषण मोजण्यासाठी २८ निरीक्षण केंद्रे असून ती सीपीसीबीशी (सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड) जोडलेली आहेत. ही केंद्रे आसपासच्या परिसरातील २ किमीपर्यंतच्या हवेतील प्रदूषणाचा स्तर मोजून त्यानुसार प्रदूषणाची पातळी निश्चित करतात. 

पालिकेच्या मानस उपक्रमात जवळपास ७५ हवा प्रदूषण मोजणाऱ्या सेन्सरची जोडणी असून ते अधिक सूक्ष्मरीत्या हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण पातळी मोजतील, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे अधिकाधिक भागातील नोंद मिळून प्रदूषणावर उपाययोजना करणे शक्य होईल असे त्यांनी म्हटले आहे. या प्लॅटफॉर्मचे काम झाल्यावर तो नागरिकांसाठी खुला करण्यात येईल आणि मुंबईकरांना तेथून हवा गुणवत्तेची अचूक माहिती उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले. 

६७६ रस्ते चकाचक केले

घनकचरा विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षकांना नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी किमान तीन प्रमुख रस्ते किंवा मार्ग दत्तक घेण्याचा उपक्रम पालिकेकडून सुरू करण्यात आला आहे.  २२० कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात आली. 

५७० मेट्रिक टन कचरा, ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ टन राडारोडा काढला. तर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची एकूण १,८८८ किलोमीटर लांबीच्या ६७६ रस्त्यांची सखोल स्वच्छता केली. रस्ते धुण्यासाठी १६३ पाण्याचे टँकर, फवारणीसाठी ११९ मिस्टिंग संयंत्राचा वापर करण्यात आला.

Web Title: Where is the air, how bad is it in mumbai? Accurate information will be available; BMC to implement 'Manas' initiative to measure air quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.