Join us

मनी लाँड्रिंगचा विषय येतोच कुठे? ईडीच्या कारवाईनंतर अनिल परब यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 09:00 IST

मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला

मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयासह मुंबई, पुणे आणि दापोली (जि. रत्नागिरी) येथे एकूण सात ठिकाणी ‘ईडी’ने गुरुवारी छापे टाकल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल १२ तासाच्या झाडाझडतीनंतर ‘ईडी’चे अधिकारी परब यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, परब यांनी तपासात ईडीला सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या यंत्रणा मला प्रश्न विचारतील त्याला मी उत्तर देणार आहे, असे ते म्हणाले. 

रिसॉर्टची मालकी सदानंद कदमांची माझ्यावर छापे टाकण्यामागे दापोलीतील रिसॉर्टचे कारण असल्याचं समोर आलं. त्या रिसॉर्टची मालकी सदानंद कदम यांची आहे. रिसॉर्टमधून समुद्रात सांडपाणी जातं, असा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मग मनी ट्रेलिंगचा विषय कुठं आला?     - अनिल परब, परिवहनमंत्री

सकाळपासूनच झडतीn ईडीचे एक पथक गुरुवारी सकाळी ६ वाजता परब यांच्या ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले. n याशिवाय वांद्रे येथील निवासस्थान, रत्नागिरीमधील दापोली येथील रिसॉर्ट आणि पुण्यातील विकासकाच्या निवासस्थानासह महत्त्वाच्या सात ठिकाणी छापे टाकत शोधमोहिम राबविली. n ईडीचे वरिष्ठ अधिकारी परब यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थातून तब्बल १२ तासांनी बाहेर पडले. दुसरीकडे त्यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या अंधेरीतील घरीदेखील अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली.

पुण्यातील दोन घरांवर ईडीच्या पथकांनी छापे घातले. मंत्री परब यांनी दापोलीतील रिसोर्टची जागा विभास साठे यांच्याकडून विकत घेतली होती. हा व्यवहार २०१७ मध्ये झाला होता. विभास साठे यांनी जागा विकली. त्यावेळी तेथे रिसोर्ट नव्हते. या व्यवहारात साठे यांना ब्लॅक मनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

ईडीचे पथक गुरुवारी सकाळी ८ वाजता पुण्यातील कोथरुड येथील सिटी प्राईडसमोर असलेल्या ‘दि पॅलेडियम’ इमारतीत आले. तेथे २० व्या मजल्यावर विभास साठे यांचे घर आहे. ईडीचे पथक दुपारपर्यंत तेथेच होते. तसेच त्यांचे दुसरे घर वनाज कंपनीसमोरील इंद्रधनू सोसायटीत आहे. हे घर त्यांनी भाड्याने दिल्याची माहिती समजली.

मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी रिसॉर्टची माहिती घेतानाच मूळ जागामालक विभास साठे यांचा जबाबही ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोंदविला आहे. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्राच्या पर्यावरण विभागाचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर हे रिसॉर्ट आपण विकले असल्याचे परब यांनी याआधीच जाहीर केले. 

टॅग्स :गुन्हेगारीअनिल परबअंमलबजावणी संचालनालय