Join us  

दहावी, बारावीच्या परीक्षा केव्हा होणार? बच्चू कडूंनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 8:07 PM

राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी एक महत्वाची माहिती दिली आहे

राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा घेतल्या जाणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी एक महत्वाची माहिती दिली आहे. 

"दहावी आणि बारावीची परीक्षा महत्वाची आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ. परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरू आहे. याबाबतचा सगळा विचार करुन दहावी, बारावीच्या परीक्षेचं स्थानिक पातळीवर नियोजन केलं जाईल. येत्या २ फेब्रुवारी किंवा ३ फेब्रुवारीला बैठकीत नियोजन करुन चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल ", असं बच्चू  कडू म्हणाले. 

गेल्या वर्षभरापासून देशात आणि राज्यात कहर केलेल्या कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. तसेच कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई वगळता इतर विभागातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही काळापूर्वी सुरू झाले होते. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधीच जाहीर केलं आहे. 

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गायकवाड यांचं विधानदहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याचा विचार सुरू असल्याचं वर्षा गायकवाड यांनी याआधी म्हटलं होतं. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी आणि आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील, अशी सूटही सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मात्र पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

टॅग्स :बच्चू कडूवर्षा गायकवाडशिक्षणशिक्षण क्षेत्रदहावी12वी परीक्षा