What is wrong with Marathi schools? | मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले?
मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले?

मुंबई : मराठीशाळांच्या बाजूने समाज उभा राहावा आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने आजवर अनेक कार्यक्रम आखण्यात आले आणि प्रयत्न केले गेले. मात्र सध्याची मराठीशाळांची परिस्थिती पाहता मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले, असा सवाल उपस्थित होतो. सगळ्यांच्याच मनातील हा प्रश्न मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या निमित्ताने चर्चिला जाणार आहे.

मराठी शाळांबाबत कोणाचे काय चुकले या सत्रात माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, शिक्षक सेनेचे प्रमुख ज. मो. अभ्यंकर आणि बेळगावातील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर ही मंडळी मराठी शाळांसमोर असलेल्या आव्हानांना कसे भिडता येईल यावर मनमोकळा संवाद साधणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ज्येष्ठ पत्रकार, लेखक प्रतिमा जोशी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष आहे़ १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम़ भट शाळेत हे महासंमेलन होणार आहे़ सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे दोन दिवसीय महासंमेलन होईल. १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. मराठी शाळा जागर फेरी आयोजित करण्यात आली आहे़ यंदाच्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ शिक्षक राज्यसभेचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार आहे़ उद्घाटन सत्रास ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि खासदार अरविंद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास असणाऱ्या मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमीत या उद्घाटन सत्राला उपस्थित राहणार आहेत.

‘लोकमत’च्या सहकाºयाने मराठी शाळांची सांख्यिकीय सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी मराठी शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईतील अडीचशेहून अधिक शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शाळांची सद्य:स्थिती जाणून घेणारे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते विलास डीके यांचा अहवाल या संमेलनात प्रकाशित करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मराठी शाळेत शिकूनही आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेल्या मुंबईतील यशवंत माजी विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या शाळेच्या नावासह या संमेलनात प्रकाशित होणार आहे. तसेच गतवर्षाच्या संमेलनातील विविध सत्रांवर आधारित
‘माझी शाळा माझा विकास’ हे डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेले पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार आहे.

Web Title:  What is wrong with Marathi schools?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.