Join us
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचं चाललंय तरी काय? नाना पटोलेंच्या व्हिडिओवरुन फडणवीसांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 21:30 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे.

मुंबई - मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर, नाना पटोले यांनी सारवासारव करत, माझे विधान गावातील गावगुंड असलेल्या मोदीनामक व्यक्तीबद्दल होते, असे त्यांनी म्हटलं. मात्र, भाजप नेते यावरुन चांगलेच संतापले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करुन पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केलंय.  

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या गृह मतदार संघात  जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते, त्यावेळी नानांनी वरील विधान केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, भाजप नेते आक्रमक झाले आहेत. 

पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो, असे म्हणतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय?, असा सवाल भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला, सत्तेसाठी काहीही❓. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच, नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केलीय.  

आमदार श्वेता महालेंनीही केलीय टीका

नानाभाऊ केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, आपण व राहुल गांधींनी बौद्धीक उंची वाढविण्याचं काम करावं. काँग्रेसच्या मनामध्ये पंतप्रधान मोदींबद्दल प्रचंड द्वेष आहे. जे त्यांच्या मनात होतं, ते आज नाना पटोलेंच्या तोंडातून समोर आलंय, अशा शब्दात आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यावर टीका केलीय.   

टॅग्स :नाना पटोलेदेवेंद्र फडणवीसकाँग्रेसनरेंद्र मोदी