Join us  

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण..." गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 9:24 PM

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतोमात्र सीबीआय तपासाची शिफारस करणे हा राज्य सरकारचा अधिकार विरोधी पक्षांचे नेते या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल, असे देशमुख म्हणाले.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख म्हणाले की, ''या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी चांगला तपास केला. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, तसेच त्यामध्ये कुठलाही दोष आढळून आला नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये संघराज्य संकल्पना आहे. मात्र आता त्या रचनेबाबत घटनातज्ज्ञांनी, विचारवंतांनी विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. सीबीआय तपासाची शिफारस करणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्याच्या परवानगीनंतर सीबीआयकडे तपास सोपवला जातो. मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आम्ही सीबीआला पूर्ण सहकार्य करू.''यावेळी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापवत असलेल्या भाजपालाही देशमुख यांनी टोला लगावला. पुढच्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणुका आहेत. विरोधी पक्षांचे नेते या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअनिल देशमुखमहाराष्ट्र सरकारगुन्हा अन्वेषण विभागसर्वोच्च न्यायालय