हवामान खात्याला लागेना मान्सूनचा अंदाज, अडथळ्यांची शर्यत; आज पावसाचे भाकीत वर्तविणार

By सचिन लुंगसे | Published: June 8, 2022 06:52 AM2022-06-08T06:52:17+5:302022-06-08T06:52:56+5:30

Monsoon : मान्सून रेंगाळण्याचे कारण विशद करताना हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले की, समुद्रात नैऋत्येकडून भारतीय भूभागावर वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्याचा अभाव आहे.

Weather forecast for Lagena Monsoon, hurdles race; Rain forecast today | हवामान खात्याला लागेना मान्सूनचा अंदाज, अडथळ्यांची शर्यत; आज पावसाचे भाकीत वर्तविणार

हवामान खात्याला लागेना मान्सूनचा अंदाज, अडथळ्यांची शर्यत; आज पावसाचे भाकीत वर्तविणार

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेले वादळ आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे केरळात २९ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासाची गती धिमी झाली आहे. प्रतिकूल हवामानामुळे हवामान खात्यालाही मान्सूनचा नेमका अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. ७ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल होणाऱ्या मान्सूनला लेटमार्क लागला असून, हवामान अभ्यासकांच्या मते ११ जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. 
पुढील प्रवासादरम्यान १६ जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग व्यापणार आहे. मान्सून रेंगाळण्याचे कारण विशद करताना हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले की, समुद्रात नैऋत्येकडून भारतीय भूभागावर वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्याचा अभाव आहे. मान्सून झेपावण्याच्या कालावधीत ईशान्य अरबी व बंगालच्या समुद्रावर अधिक उंचीचे कमी दाब क्षेत्राच्या तसेच चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली निर्मितीचा अभाव आहे. देशाच्या भूभागावर पूर्व-मोसमी पावसाचा अभाव असून, पर्यायाने देशात मोसमी पाऊस झेपावण्यास सध्या प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून प्रगतीस अडथळा जाणवू लागला. 

अंदाज चुकला का?
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजात मुळीच कोणतीही विसंगती नाही, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली, मात्र तरीही अंदाज चुकला, असा प्रश्न कायम आहे. 

 मोसमी पावसाची शक्यता  
८ आणि ९ जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात मध्यम अवकाळीपूर्व मोसमी पावसाची शक्यता जाणवते. रेंगाळलेल्या मोसमी (मान्सून) पावसाच्या प्रगतीसाठी या पावसाचा उपयोग होईल.

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून आता केरळमध्ये स्थिर होत आहे. तिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. 
-   १० जूनच्या आसपास मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल. मुंबईत ११ जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल. वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास धिमा झाला आहे. 
-     वाऱ्याने गती पकडली की मान्सूनच्या पुढील प्रवासाचा वेग वाढेल, असे खासगी हवामान संस्था वेगरिज ऑफ दी वेदरने सांगितले आहे.

मान्सून मुंबई, महाराष्ट्रात दाखल होण्याची कोणतीही तारीख हवामान खात्याने जाहीर केलेली नाही. मान्सून महाराष्ट्रात केव्हा येणार याचा अंदाज बुधवारी दिला जाणार आहे. मान्सूनला विलंब झालेला नाही. मान्सून मुंबईत दाखल होण्याची अंदाजे तारीख ७ जून असली तरी त्यात चार दिवसांचा मागे- पुढे फरक पडतो.
- मृत्युंजय महोपात्रा, महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग      

Web Title: Weather forecast for Lagena Monsoon, hurdles race; Rain forecast today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस