दोघे भाऊ काय बोलतात हे लवकरच कळेल...! आदित्य ठाकरे : विक्रोळीत उद्धवसेनेचा निर्धार मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:13 IST2025-12-23T11:12:39+5:302025-12-23T11:13:06+5:30
आ. सुनील राऊत यांनी कांजूरमध्ये निर्धार मेळावा घेतला. त्याला आदित्य ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले.

दोघे भाऊ काय बोलतात हे लवकरच कळेल...! आदित्य ठाकरे : विक्रोळीत उद्धवसेनेचा निर्धार मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक उद्धवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. ठाकरेबंधू जे उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. दोन भाऊ काय भूमिका घेणार, हे आपल्याला लवकरच कळेल, असे उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी विक्रोळीतील निर्धार मेळाव्यात शनिवारी सांगितले.
आ. सुनील राऊत यांनी कांजूरमध्ये निर्धार मेळावा घेतला. त्याला आदित्य ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वापरलेली मशाल हे आपल्या पक्षाचे प्रतीक असून ते घराघरात पोहोचवण्यावर भर द्या. सोशल मीडियावरील खोट्या प्रचाराला जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
वोट चोरी हा आपल्या प्रचाराचा मुद्दा नाही. पण, मतदारयादीत काय झाले ते सांगितले पाहिजे. कुणाला उमेदवारी मिळेल कुणाला मिळणार नाही, पण कुणी नाराज न होता पक्षाच्या उमेदवारचे काम करावे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपला महाराष्ट्राची भीती वाटते : राऊत
खा. राऊत म्हणाले, “आजारी पडल्यानंतरचे माझे हे पहिलेच भाषण आहे. उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. पण, बाळासाहेबांनी उभी केलेली गरम रक्ताची फळी थंड बसू शकत नाही. भाजपला महाराष्ट्राची भीती वाटू लागली म्हणून त्यांनी शिवसेना फोडली.” खासदार, आमदार विकत गेले. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मतदारांना फसवले, अशी टीका त्यांनी केली.