बाहेर गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणू; एकनाथ शिंदेंचा शब्द, रखडलेल्या प्रकल्पांबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 05:45 IST2025-01-31T05:44:49+5:302025-01-31T05:45:38+5:30
समूह विकासाचा प्रयत्न केला, तर अधिक जागा उपलब्ध होऊन सर्वांना न्याय देता येईल, असेही शिंदे म्हणाले.

बाहेर गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणू; एकनाथ शिंदेंचा शब्द, रखडलेल्या प्रकल्पांबाबत म्हणाले...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रखडलेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. नालासोपारा, बदलापूरपर्यंत गेलेल्या या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करू आणि त्यांना परत आणू, अशी ग्वाही मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर दिली.
मुंबई शहरातील सर्व मतदारसंघातील समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या समस्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांसाठी नवे गृहनिर्माण धोरणच आणले जात आहे, यामध्ये वरिष्ठ नागरिक, गिरणी कामगार, पोलिस, डबेवाले, झोपडपट्टीवासीय या सर्वांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचबरोबर बाकीच्या शासकीय यंत्रणांनीही यात सहभाग घेतला पाहिजे, यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. एमएसआरटीसी, एमएमआरडीए, महाप्रीत, मुंबई महापालिका, सिडको यांनी एकत्रितपणे रखडलेले प्रकल्प पूर्ण करावेत. समूह विकासाचा प्रयत्न केला, तर अधिक जागा उपलब्ध होऊन सर्वांना न्याय देता येईल, असेही शिंदे म्हणाले.
औषधे, सामग्रीची कमतरता पडू देणार नाही
मुंबईतील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर सीटीस्कॅन एमआरआय मशीन्स उपलब्ध नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात. यासंदर्भातही व्हेंटिलेटरसह अन्य सामग्री कमी पडणार नाही, ती ताबडतोब खरेदी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, तसेच मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दाही कळीचा असून त्याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीत मागण्या
मुंबई जिल्हा नियोजन समिती ६९० कोटी रुपयांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये झोपडपट्टी विकासासाठी २२५ कोटी, रुग्णालयांसाठी ८५ कोटी, पोलिस वसाहत आणि स्टेशनसाठी ६३ कोटी, कुलाबा कॉजवेसाठी २ कोटी रुपये मागणी करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे अनुपस्थित
या बैठकीला उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मुंबई शहरातील सर्व आमदार उपस्थित होते. आमदार सुनील शिंदेही उपस्थित होते. मात्र, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. आदित्य ठाकरे यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगली.
आमदारांनी उपस्थित केले विविध मुद्दे
या बैठकीत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी, नितेश राणे यांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुरखा घालण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केल्याबाबत आक्षेप घेतला. ज्योती गायकवाड यांनी सायन उड्डाणपुलाबाबतचा प्रश्न उपस्थित केला, तर सुनील शिंदे यांनी मुंबईत बेस्ट बसच्या होणाऱ्या अपघाताबाबत चिंता व्यक्त केली.