'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:14 IST2025-12-24T14:13:13+5:302025-12-24T14:14:08+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी आज मनसेने अधिकृत युतीची घोषणा केली.

'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या गोष्टीवर आज शिक्कामोर्तब झाले. मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंचीशिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची युती झाल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील इतर महापालिका क्षेत्रात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार की नाही याबाबत आज सांगण्यात आलेले नाही. पण 'एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी' असे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा म्हणाले. ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्याची सुरुवात कुठल्या वाक्यापासून झाली, याबाबत राज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते वाक्य कुठलं?
"जाहीर सभा सुरू होतील तेव्हा आम्ही सर्व जण विविध मुद्द्यांवर बोलू. विरोधक काय टीका करतात, त्यांच्याकडून काय बोलले जाते, यावर आम्ही आता बोलणार नाही. बाकी सर्व काही मुद्दे सभेत आम्ही बोलू. पण आता मला असे सांगायचे आहे की माझी एक मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की, 'कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.' याच वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या 'मनोमिलना'ची कहाणी सांगितली.
शिवसेना-मनसे युतीची घोषणा
"कोण किती जागा लढवणार, आकडा काय असेल, हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत. त्यात दोन टोळ्या वाढल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधील मुले पळवतात. मी सध्या इतकेच सांगतो की जे लोक उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, त्यांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे, तेही सांगितले जाईल. आज मी फक्त सर्वांना एवढेच सांगतो की महाराष्ट्र ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता, ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो," असेही राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्रप्रेमींची ही युती आहे. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही. त्याच्या वाटेला कुणी आले तर त्याला सोडत नाही. आज मुंबईचे लचके तोडायचे काम सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या ५ लढवय्यांमध्ये प्रबोधनकार होते. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे. आज केवळ महाराष्ट्र नाही तर अख्खा देश बघतोय. विधानसभेवेळी भाजपाने अपप्रचार केला होता बटोगे तो कटोगे..तसेच आता मी मराठी माणसांना आवाहन करतोय, आता जर चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल. तुटू नको, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका," असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला केले.