'नाथाभाऊंची अवहेलना आवडली नाही', खडसेंना काँग्रेसकडून ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 14:00 IST2019-12-10T13:30:37+5:302019-12-10T14:00:13+5:30
राज्यातील भाजपा नेतृत्वावरुन खडसेंनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली होती

'नाथाभाऊंची अवहेलना आवडली नाही', खडसेंना काँग्रेसकडून ऑफर
नवी दिल्ली - भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर खडसे आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. विशेष म्हणजे आपली खदखद व्यक्त करण्यासाठी दिल्लीला गेलेले खडसे भाजपाच्या एकाही नेत्याला भेटल्याशिवाय मुंबईत परतणार आहेत. खडसेंच्या या भेटीगाठीच्या दौऱ्यावरुन काँग्रेसने खडसेंना ऑफर दिली आहे.
राज्यातील भाजपा नेतृत्वावरुन खडसेंनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
''नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अवहेलना झालेली आम्हालादेखील आवडलं नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव नाही, आम्हीदेखील काही प्रस्ताव दिला नाही. पण, अशी माणसं पक्षात अली तर आनंदच होईल, पक्षाला बळकटी मिळेल, असे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी,'' असा टोलाही थोरातांनी लगावला.
खडसे अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. आपल्या मनातील हीच खदखद ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी खडसे दिल्लीला पोहोचले होते. मात्र, त्यांनी भाजपाच्या एकाही नेत्याची भेट घेतली नाही. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज लोकसभेत होते. मात्र राज्यसभा खासदार असलेल्या कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांचीही खडसेंनी भेट घेतली नाही. त्यामुळे खडसे खरच वेगळा विचार करुन वेगळ्या पक्षाची वाट धरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, आपण सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नावर पवारांची भेट घेतल्याचं खडसेंनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंनी वारंवार पक्षावर टीका केली आहे. वेगळा विचार करू, असा निर्वाणीचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे खडसे-ठाकरे भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यात, बाळासाहेब थोरातांनी सूचक विधान करत खडसेंना बळ दिलं आहे.