"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 23:24 IST2026-01-07T23:23:25+5:302026-01-07T23:24:06+5:30
१६ तारखेनंतर एकही बांगलादेशी, रोहिंग्याला मुंबईत ठेवणार नाही ही धमकी देऊन जातोय असं नितेश राणे यांनी म्हटलं.

"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
मुंबई - आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही. आपल्या देशात जो राष्ट्रभक्त मुसलमान राहतो तो आपल्यासोबत आहे आणि तो आपल्या हक्काचा आहे. आमच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जा, तिथे आमच्यापेक्षा चांगले मराठी बोलणारे मुस्लीम आहेत. आमच्या सणाला खांद्याला खांदा लावून बसतात. हे राष्ट्रभक्त मुसलमान आहेत हे आम्ही अभिमानाने सांगतो. पण आमच्या देशाच्याविरोधात, आमच्या हिंदू धर्माविरोधात जो कुणी जिहाद करतो, त्याला ठोकणार. त्या जिहादींविरोधात आम्ही आहोत आणि त्यांना संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी उघड धमकीच मंत्री नितेश राणे यांनी दिली.
कांदिवली येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी नितेश राणे यांची सभा झाली. यावेळी नितेश राणे म्हणाले की, जे राष्ट्रभक्त मुस्लीम आहेत ते आमच्यासोबत आहेत हे अभिमानाने सांगतो. पण १५ तारखेनंतर जे कुणी बांगलादेशी रोहिंग्या इथं असतील त्यांनी आपापल्या बॅगा भरून ठेवा. १६ तारखेनंतर एकही बांगलादेशी, रोहिंग्याला मुंबईत ठेवणार नाही ही धमकी देऊन जातोय. एकही घाण ठेवणार नाही. सगळे साफ करणार, मुंबईत ही घाण नको. जे काही इथे आहे ते आमच्या मुंबईकरांचे आहे. आमच्या हिंदूंचे आहे आणि राष्ट्रभक्तांचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कुणी दमदाटी देत असेल तर त्याची चिंता करू नका. आज मंत्री असलो तरी या सगळ्यांची जबाबदारी आमच्यावर सोडा. जिथे कुठे जनतेच्या विरोधात कुणी मस्ती करत असेल, दमदाटी करत असेल. महायुतीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांविरोधात गुंडगिरी करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवा, १६ तारीख आमची आहे. नेहमी हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याचं काम काही लोक करतात. त्याचे नुकसान हिंदू समाजालाच झाले आहे. आज महापालिकेत तुम्हाला वार्डाचे प्रश्न सोडवायचे असेल. घराचे प्रश्न सोडवायचे असेल तर तुमच्या मागे कोण उभे राहील,अंतिम सही कोण करू शकते याचा विचार करावा असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
दरम्यान, काहींना मराठी माणसांचा पुळका आल्यासारखे करतात. आम्ही मूळ शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, चायनिज नाही. त्यामुळे मराठी माणसांची जी भाषा हे करतात. उत्तर भारतीय इथं मोठ्या संख्येने आहेत. मराठी यायलाच हवी असं बोंबलणारे काही पक्ष आहेत. त्या लोकांना सांगा, आधी बेहरामपाड्यात जाऊन मराठी शिकवा त्यानंतर मला शिकवा. त्यानंतर काय होते बघू. तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे तुम्ही मुंबईत सुरक्षित आहात. ही गॅरंटी घेऊन मी इथं आलोय असं सांगत नितेश राणे यांनी उत्तर भारतीयांना साद घातली.