"आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही...!" राज ठाकरे हिंदूत्व अन् मराठीच्या मुद्द्यावर थेटच बोलले, स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:32 IST2026-01-04T15:30:49+5:302026-01-04T15:32:12+5:30
"...मग हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार, इथे कसलं हिंदू-मराठी करताय तुम्ही?"

"आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही...!" राज ठाकरे हिंदूत्व अन् मराठीच्या मुद्द्यावर थेटच बोलले, स्पष्ट केली भूमिका
हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार, इथे कसलं हिंदू-मराठी करताय तुम्ही? मी त्या दिवशी म्हटलं नाही तुम्हाला की, 'आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत', अशा धारदार शब्दात मनसे अध्यक्ष राज ठकरे यांनी आज हिंदूत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करून लढत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांचा संयुक्त वचननामा आज प्रसिद्ध केला. यावेळी राज ठकरे बोलत होते. महत्वाचे म्हणजे, शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात आले होते.
"इथे कसलं हिंदू-मराठी करताय तुम्ही?" -
आपण सातत्याने म्हणत आहात की मुंबईचा पुढचा महापौर मराठी होणार, मुख्यमंत्री सातत्याने म्हणत आहेत की, पुढचा महापौर हिंदू होणार आणि मराठी होणार. तर आपल्याल असे वाटते का की, हिंदू आणि मराठी या दोन शब्दांच्या माध्यमाने एक विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे? यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो, पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं तीन संस्थानं उभी राहिली, त्यातलं एक गुजरातचं गायकवाडांचं शिंद्यांचं, म्हणजे सिंदिया ज्यांना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं. बरोबर आहे? जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं जे मराठीशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर? मग त्या बडोद्यामध्ये सगळे महापौर गुजराती का होतातहो? मग हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार, इथे कसलं हिंदू-मराठी करताय तुम्ही?"
"आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही" -
राज पुढे म्हणाले, "मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला, की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे." तसेच, "आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार," असे राज ठकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
याचा अर्थ भाजपा मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? : उद्धव ठाकरे -
राज यांचे उत्तर संपताच, याच उत्तराचा धागा धरत उद्धव ठाकरे म्हणाले, प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजपा मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत. मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत अस्सल हिंदूच आहोत आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला, त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.