Join us

"विमानतळावरही पाणी साचले, आता बंदराची गरज नाही"; उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:29 IST

'चोरबाजारात माणुसकी हरवली'; असेही ते म्हणाले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विमानतळावरही पाणी साचले. त्यामुळे आता बंदराची गरज नाही. जहाजे व विमाने दोन्ही तिथेच येतील, असा टोला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सरकारला लगावला.

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते व माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी मातोश्री येथे उद्धवसेनेत प्रवेश केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिव व नेते विनायक राऊत, माजी आ. रोहिदास चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बाेलत होेते.

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करून ते म्हणाले, नांदेड येथे आलेली आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. त्या गावकऱ्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन केले असते तर कोणाला जीव गमावण्याची वेळ आली नसती. ११ गावांचे पुनर्वसन न करता धरणाचे काम सुरू केले त्यातून ही आपत्ती ओढवली. सरकारला माणसांची किंमत नाही, यांना फक्त ठेकेदारांचे खिसे कसे भरायचे हेच माहिती आहे.

‘चोरबाजारात माणुसकी हरवली’

मुंबईत भगवे वादळ येत आहे. पण, नैसर्गिक वादळ आले आहे त्याचे काय? मुंबईमध्ये नवीन नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे. राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसा राजकारणासाठी धुमाकूळ घातला जात आहे. पैसे, मत, पक्ष चोरणारे चोरच दिसत असून या चोरबाजारात माणुसकी हरवली आहे, अशी टीकाही ठाकरेंनी केली.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबईचा पाऊसपाऊस