Join us
Daily Top 2Weekly Top 5

"युद्ध जिंकले, पण तहात हरले"; आंदोलन विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनाही शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 15:48 IST

आता, जितेंद्र आव्हाड यांनीही शंका उपस्थित केली आहे. 

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. स्वत: जरांगे यांनी यासंदर्भातील घोषणा करुन आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. तर, सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांगेंना फळांचा रस देऊन त्यांचे उपोषणही सोडण्यात आले. मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जरांगेंच्या मागणीचा अध्यादेशही राज्य सरकारने काढला आहे. मात्र, या अध्यादेशावरुन आता अनेक चर्चा घडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, जितेंद्र आव्हाड यांनीही शंका उपस्थित केली आहे. 

जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले असल्याची पहिली प्रतिक्रिया ओबीसी नेते, माजी खासदार  हरीभाऊ राठोड यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला, त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु  तहामध्ये मात्र हरले, असे चित्र उभे ठाकले आहे. वंचित, बहुजन आणि बारा-बलुतेदार समाजाच्या ताटातील भाकरी खाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या मावळ्यांनी, असा कुठला विजय प्राप्त केला, असा सवाल राठोड यांनी विचारला. जरांगेंच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल तर निश्चितच मंत्री भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसींच्या लढ्याला अपयश आले आहे, असे ते म्हणाले. तर, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनीही युद्ध जिंकले, तहात हरले... अशी प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली आहे. 

आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट करताना, मराठा आरक्षणासंदर्भातील कुठलाही उल्लेख केला नाही. मात्र, ओझरती प्रतिक्रिया दिली असून त्यांनी साधलेल्या वेळेनुसार ही आरक्षण अध्यादेशानंतर त्यांची आलेली प्रतिक्रिया दिसून येते.

संजय राऊत यांनीही उपस्थित केला प्रश्न

राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार मराठा समाजाला सरसकट किंवा सगेसोयऱ्यांना आरक्षणाचे दाखले मिळतील का, त्या आदेशानुसार हे मार्गी लागतंय का हे आगामी काही दिवसांत कळेल. आमची एवढीच इच्छा आहे, सरकारने आज आश्वासनं दिले आहेत, किंवा अध्यादेश काढले आहेत, मुख्यमंत्री तिथे गेले आहेत. पण, मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा याच प्रश्नावरुन आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आरक्षणाच्या अध्यादेश निर्णयावर आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणमराठामुंबईजितेंद्र आव्हाड