Join us  

Virar Hospital Fire : "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे", भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:11 AM

Virar Hospital Fire BJP Kirit Somaiya And Thackeray Government : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबई - विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली.  या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीनंतर रुग्णालयातील अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. 

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी (BJP Kirit Somaiya) यावरून हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी" असं म्हटलं आहे. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे" असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक - उपमुख्यमंत्री अजित पवार

"विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले; ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!  मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल मी सहसंवेदना व्यक्त करतो. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून त्यात रुग्ण मृत्युमुखी पडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील,याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.रुग्णालयांची सुरक्षितता,फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशात अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा मला विश्वास आहे."

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसवसई विरारमृत्यूआगकिरीट सोमय्याभाजपाराजेश टोपे