Join us  

विनोद तावडेंनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची घेतली भेट, तर्कवितर्कांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 1:10 PM

भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.

मुंबई- भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास एक तास चर्चा झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्या जवळपास तासभर चर्चा झाली. परंतु या चर्चेची माहिती अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेली नाही. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. ठाण्यात होऊ घातलेल्या नाट्यसंमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंकडे गेलो होतो, अशी माहिती स्वतः विनोद तावडेंनी दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे सातत्यानं मोदी आणि भाजपावर हल्लाबोल करत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष भाजपाच्या विरोधात एकवटले, याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले होते. सर्व पक्षांनी एकत्र यावे यासाठीचा पहिला गियर आपण गुढीपाडव्याच्या सभेमध्ये टाकला होता. तेथूनच ही प्रक्रिया सुरू झाली, देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल, परिस्थिती बदलेल. एक माणूस खोटं बोलून देशाला फसवतो हे आता लोक खपवून घेणार नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं.आता येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सर्व प्रकारची ताकद वापरेल, दंगे घडवेल पण जनता त्यांना बधणार नाही. यासाठी देशातील सर्व विरोधक आता एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यांचीच मनधरणी करण्यासाठी विनोद तावडे गेल्याचीही चर्चा आहे.  

टॅग्स :राज ठाकरेविनोद तावडेमनसेभाजपा