मुंबई - Allegation on Rohit Pawar ( Marathi News ) विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत भाजपा आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल याचं मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार असं त्यातला इसम बोलतो, देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्रातले ब्राह्मण ३ मिनिटांत संपवून टाकू असं बोलतो. याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यात ज्याला पकडण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल कदम यांनी विचारला.
विधानसभेत आमदार राम कदम म्हणाले की, महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि मराठेच राज्य करणार असं तो बोलतो. देवेंद्र फडणवीसांबद्दल कोण असं बोलणार असेल तर ते सहन करणार नाही. योगेश सावंत असं या माणसाचे नाव आहे. त्याचे संबंध बारामतीशी असून या माणसाला सोडण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवारांचा योगेश सावंतशी काय संबंध? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठ्यांच्या आडून राज्यात जातीतेढ निर्माण करण्याचं काम रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते मराठा समाजाला बदनाम करतायेत. मराठा समाजाला एकही मोर्चा चुकीच्या मार्गाने गेला नाही. शांततेत निघाला. पण बीडमध्ये जाळपोळ, दगडफेक केली असं त्यांनी म्हटलं.
तर कुठल्याही नेते, समाजाविरोधात असं विधान करणे कुणीही मान्य करणार नाही. मात्र सभागृहात शरद पवारांचे नाव घेतलं गेले, कुणाचेही नाव घेण्याआधी नोटीस द्यावी लागते. पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कुणाचेही नाव घेण्याचा अधिकार नाही. जर नाव घेतले असले तर कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, एक समाज ३ मिनिटांत आम्ही संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू असं व्हिडिओत आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. त्याने तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहे असं मान्य केले. रोहित पवार यांनी स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचा संबंध काय? मराठा समाज शांततेत आंदोलन करतो. जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या बाजूने भूमिका घेतली. परंतु जेव्हा त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास यायला लागला तेव्हा आता सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या. योगेश सावंतचा पत्ताही बारामतीतला आहे. रोहित पवार यांचा योगेश सावंतशी संबंध काय ? योगेश सावंत याच्यामागे कोण कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे असं आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले.