Vidhan Sabha 2019 : 'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 11:35 IST2019-09-21T11:35:10+5:302019-09-21T11:35:32+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 4 वर्षात कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप युतीच्या सरकारवर झाले नाहीत.

Vidhan Sabha 2019 : 'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये आले आहेत. ज्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली तेच राजकारण त्यांच्या अंगलट आलं आहे. शरद पवारांचे राजकारण आता संपुष्टात आले आहे. शरद पवारांनी तोडण्या-फोडण्याचं राजकारण केले त्यामुळे आता त्यांना हे भोगावे लागत आहे. नवीन पिढीचं राजकारण वेगळं आहे. मी शरद पवार नाही, मी देवेंद्र फडणवीस आहे आता आमचं राजकारण सुरु झालंय अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 4 वर्षात कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप युतीच्या सरकारवर झाले नाहीत. विरोधकांनी भाषणात घोटाळ्याचे आरोप केले, विरोधकांनी एकाही आरोपाचे पुरावे दिले नाहीत. हवेत आरोप करतात, पुरावे द्यावेत, 15 वर्ष आम्ही विरोधात होतो एकही आरोप पुराव्याशिवाय लावला नाही. हायकोर्टातही आरोप सिद्ध झाले नाही असा दावा त्यांनी केला.
तसेच आघाडी शासन असताना आम्ही पुरावे देऊन आरोप केले, त्याची साधी चौकशीही या लोकांनी केली नाही. मात्र यांनी जे पुराव्याशिवाय आरोप केले त्यांची चौकशी आम्ही केली. त्यामुळे विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राजकारणात A to Z प्लॅन तयार असतात. पंतप्रधान भाजपाच्या महाजनादेश यात्रेत आले ते युतीच्या व्यासपीठावर आले नव्हते. महायुतीचा झेंडा विधानसभेवर लावणार हे मी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री म्हणून मीच असेन या साशंकता नाही असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
...तर मी राजकारणाचा सन्यास घेईन
पत्नी अमृता फडणवीस यांच्या एक्सिस बँकेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून एक्सिस बँकेत बदलली. मात्र हा निर्णय एक्सिस बँकेत पोलिसांचे खाते बदलण्याचं काम मार्च 2005 मध्ये झाले. अमृतासोबत माझं लग्न नोव्हेंबर 2005 मध्ये झालं. मला स्वप्न पडलं नव्हतं मी 2019 मध्ये मुख्यमंत्री होईन. त्यामुळे माझ्यावरील एकही आरोप सिद्ध केले तर मी राजकारणात सन्यास घेईन अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.