Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:10 IST2026-01-09T17:10:02+5:302026-01-09T17:10:29+5:30
भाजपाच्या या कार्यकर्त्यांकडून डिवचल्यानंतर शिंदेसेनेनेही भाजपाविरोधात घोषणाबाजी केली.

Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
मुंबई - महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यात मुंबई महापालिकेत भाजपा शिंदेसेना महायुतीसमोर ठाकरे बंधू यांच्या युतीचे आव्हान आहे. यातच मुंबईत अजब प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक १७३ मध्ये भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. त्यात या मैत्रीपूर्ण लढतीत राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे.
आतापर्यंत उद्धवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना डिवचण्यासाठी '५० खोके एकदम ओके' असा नारा दिला होता. मात्र आता याच घोषणेचा वापर मित्रपक्ष असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांकडून शिंदेसेनेविरोधात केला जात आहे. वार्ड क्रमांक १७३ मध्ये भाजपाच्या शिल्पा केळुसकर आणि शिंदेसेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. शुक्रवारी सकाळी प्रचारावेळी या दोन्ही पक्षांची कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपाच्या या कार्यकर्त्यांकडून डिवचल्यानंतर शिंदेसेनेनेही भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. या घडलेल्या प्रकारावर शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपाला सुनावले. हे नारे लावण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी फडणवीसांना विचारले पाहिजे, आज तुम्ही आमच्यामुळेच सत्तेत आहात. भाजपाचा असा कोणता महारथी आहे जो अशाप्रकारे कृत्य करतोय ते आम्हाला पाहायचे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.
दरम्यान, महायुतीत ही जागा शिंदेसेनेला सुटली होती. मात्र त्याठिकाणी भाजपा उमेदवाराने कलर झेरॉक्स एबी फॉर्म काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यातून वार्ड क्रमांक १७३ मधील लढत आणखी रंजक बनली आहे आणि यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. मुंबईत भाजपा १३७ तर शिंदेसेना ९० जागांवर निवडणूक लढत आहे. महायुतीसमोर ठाकरे बंधूंच्या शिवशक्ती युतीचे आव्हान आहे. त्यात उद्धवसेना १६४, मनसे ५३ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर निवडणूक लढवत आहे.