Join us  

Video: मालिकांमधूनही भाजपाचा प्रचार जोरात, काँग्रेसने घेतला आक्षेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 2:48 PM

भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे निर्माते मोदी सरकारच्या योजनेचा प्रचार करत आहेत.

मुंबई - देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सगळेच पक्ष विविध माध्यमातून जाहिराती करून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र टीव्ही सिरियलच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे निर्माते मोदी सरकारच्या योजनेचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर आणि चॅनेलच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 

सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचं राजकारण दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात आहे. प्रचारासाठी भाजपाकडून कार्यक्रमाचा वापर करण्यात करण्यात येत आहे. पराभवाच्या भितीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे भाजपा अशाप्रकारे मालिकांमधील कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचाराचं तंत्र वापरत आहे. अशाप्रकारे करण्यात येत असलेला प्रचार आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 

सध्या देशभरात राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करत असतात. यामध्ये सर्वाधिक तक्रारी भाजपाविरोधात करण्यात येत आहेत.  भाजपाकडून आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट, ट्रेनमधील चहाच्या कपांवर लिहिलेले ‘मैं भी चौकीदार’ नमो टीव्ही’ तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते. यानंतर आता आणखी भर म्हणून चॅनेलवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांच्या माध्यमातून भाजपाचा प्रचार सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

अँड टिव्हीवरील लोकप्रिय असलेल्या ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतून भाजपच्या सरकारी योजनांचा प्रचार करण्यात आला आहे. मालिकेचे मुख्य पात्र मनमोहन तिवारी हे एका भागात स्वच्छ भारत मोहिमेबद्दलची आणि मोदींनी ९ कोटी शौचालय बांधल्याची माहिती देत मोदींचे गुणगान गाताना दिसत आहेत.

याशिवाय उज्वला योजनेची माहिती अंगुरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रे देताना दिसत आहे. शिवाय तुझसे हैं राबता या मालिकेतूनही भाजपच्या योजनांची माहिती देत नामुमकिन है अब मुमकिन असे वाक्य शेवटी मालिकेतील एका पात्राच्या तोंडी आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकभाजपाकाँग्रेसनरेंद्र मोदीभाभीजी घर पर हैतुझसे है राबता