The victim of Urmila Matondkar in the Deora-Nirupam conflict, even using the state's name for retaliation. | देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी, राजीनाम्याचाही आरोप्र-प्रत्यारोपासाठी वापर

देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी, राजीनाम्याचाही आरोप्र-प्रत्यारोपासाठी वापर

ठळक मुद्देउलट, निरूपम-देवरा यांच्यातील नेतृत्वाच्या वादात उर्मिलाने पाठविलेले पत्रच व्हायरल करण्यात आले.

गौरीशंकर घाळे

मुंबई : गटबाजी आणि विश्वासघाताचे कारण देत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतरही काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा आणि संजय निरूपम यांनी ट्विटरद्वारे अप्रत्यक्षपणे एकमेकांवर शरसंधान साधत गटबाजी सुरूच राहणार असल्याचे सिद्ध केले. 

लोकसभा निवडणुकीपुर्वी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात होती. निरूपम यांना उत्तर मुंबई ऐवजी उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. तर, मुंबईती इतर कोणताच नेता उत्तर मुंबईत भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास तयार नव्हता. तेंव्हा निरूपम यांनीच उर्मिला मातोंडकर यांना प्रयत्नपूर्वक निवडणुकीच्या रिंगणात आणले. उत्तर मुंबईतील आपल्या विश्वासू सहकाºयांवर प्रचारमोहिमेची जबाबदारी सोपविली. मात्र, त्यानंतर थोड्याच दिवसात ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरूपम यांच्या जागी मिलींद देवरा यांच्याकडे मुंबई अध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली. शह-काटशहाच्या या राजकारणार उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतील नेते, पदाधिकाºयांकडून प्रचारात साथ मिळाली नाही. त्यामुळे आपला पराभव झाल्याची उर्मिला यांची भावना झाली. याबाबत त्यांनी तत्कालीन पक्षाध्यक्ष देवरा यांना १६ मे रोजी सविस्तर पत्र लिहून संबंधित पदाधिकाºयांवर कारवाईची मागणी केली. मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. 

उलट, निरूपम-देवरा यांच्यातील नेतृत्वाच्या वादात उर्मिलाने पाठविलेले पत्रच व्हायरल करण्यात आले. तेंव्हा देवरा यांच्याकडूनच हे पत्र फोडण्यात आल्याचा आरोप निरूपम यांनी केला होता. आज उर्मिलाने राजीनामा जाहिर केल्यानंतर पुन्हा एकदा निरूपम आणि देवरा यांनी ट्विटरवरून एकमेकांना लक्ष्य केले. ‘कोणत्याही संघटनेत पक्षांतर्गत संघर्ष असतोच, त्यामुळे धीराने परिस्थितीला तोंड देण्याचा सल्ला मातोंडकर यांना यापुर्वीच दिला होता. त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावे,’ असे ट्विट निरूपम यांनी केले. तर, ‘ज्यांनी पक्षात आणले त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली तरी मी उर्मिला यांच्या प्रचाराला पूर्ण पाठिंबा दिला होता. उत्तर मुंबईती ‘त्या’ पदाधिकाºयांविरोधात कारवाई व्हायलाच हवी,’ असे ट्विट देवरा यांनी केले आहे. शिवाय, उर्मिलाने पाठिंब्याबद्दल देवरा यांचे आभार मानल्याचे ट्विटही देवरा यांच्या समर्थकांकडूण व्हायरल करण्यात येत आहे. उर्मिलाने गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनाम्याआडून एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी काँग्रेस नेते सोडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: The victim of Urmila Matondkar in the Deora-Nirupam conflict, even using the state's name for retaliation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.