शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:22 IST2025-07-21T19:21:18+5:302025-07-21T19:22:09+5:30
उपेंद्र गावकर यांची गोवा राज्यप्रमुखपदी तर काशिनाथ मयेकर यांची गोवा राज्य सचिव पदी नियुक्ती

शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्य संपर्कनेतेपदी पक्षाचे जेष्ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर तर गोवा राज्य संपर्कप्रमुखपदी माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत, उपेंद्र गावकर यांची गोवा शिवसेना राज्यप्रमुखपदी व काशिनाथ मयेकर यांची गोवा राज्य सचिवपदी नियुक्ती केली. नियुक्तीचे पत्र शिंदे सेनेचे मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मान्यवरांना काल गोरेगाव पूर्व नेस्को येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार, राष्ट्रीयत्व, भुमिपूत्रांवरील अन्यायाचे निवारण हे विचार घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेना गोव्यात पदार्पण करीत आहे. गोव्याच्या राजकीय पटलावर येणा-या काळात दोन लोकसभा, चाळीस विधानसभा व बारा तालुक्यांमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिका-यांच्या नेमणूका करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून एक लाख शिवसेना प्राथमिक सदस्यता नोंदणी मोहीम राबवण्याचे उद्दीष्ट येत्या ३ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
पणजी येथे शिंदे सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना लवकरच करण्यात येणार असून दक्षिण गोव्यासाठी मडगाव येथे व उत्तर गोव्यासाठी म्हापसा येथे अशी तीन कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती गोवा राज्य संपर्कप्रमुख सुभाष कांता सावंत यांनी दिली.