Mumbai Crime: असले मित्र नको रे बाबा! बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीच्या डोक्यात घातली वीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:28 IST2025-05-27T13:27:20+5:302025-05-27T13:28:10+5:30
Mumbai News: मुंबईतील कांदिवली परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात वीट घातल्याचा संतापजनक प्रकार घडला.

Mumbai Crime: असले मित्र नको रे बाबा! बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीच्या डोक्यात घातली वीट
मुंबईतील कांदिवली परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात वीट घातल्याचा संतापजनक प्रकार घडला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या जबाबावरून संबंधित तरुणाला अटक करण्यात आली. मुलीने आरोपीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
राहुल सिंह (वय, १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून वाराणसीतील रहिवासी आहे. आरोपी आणि पीडिता एकमेकांना चांगले ओळखतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताने आरोपीच्या फोनला उत्तर देणे बंद केल्याने तो वाराणसीहून मुंबईला आला. त्यानंतर २४ मे २०२५ रोजी आरोपीने पीडिताची भेट घेतली. परंतु, संजय नगरमधील गोसालिया रोडवर दोघेही सोबत चालत असताना पीडिताने आरोपीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडिताला शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेली वीट उचलून तिच्या डोक्यात मारली आणि तिचा फोनही फोडला.
या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली. तिला तातडीने महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पीडिताने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.