Join us

वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 20:47 IST

Vaibhav Khedekar News: दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेशाला आता नेमका कधी मुहूर्त मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.

Vaibhav Khedekar News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २५ ऑगस्ट रोजी कोकणातील नेते वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. हा निर्णय मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी जाहीर केला. यानंतर येथील माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला. परंतु, दोन वेळा वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त हुकला आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ४ सप्टेंबर २०२५ रोजी निश्चित करण्यात आला होता. भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी तसे जाहीर केले होते. परंतु, राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले गेले. यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वैभव खेडेकर यांचा भाजपातील पक्ष प्रवेश पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे. 

शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह वैभव खेडेकर मुंबईत 

वैभव खेडेकर हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत, असे समजते. भाजपा प्रवेशावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कोकणातून समर्थकांना मुंबईत आणले आहे. परंतु, त्यांचा भाजपा प्रवेश दोन दिवसांनी लांबल्याचे म्हटले जात आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे हे आजारी असल्याने आणि मराठा, ओबीसी आरक्षणाच्या विषयामुळे हा पक्षप्रवेश सोहळा लांबला होता. आता हाच सोहळा आणखी दोन दिवस लांबलेला आहे.

वैभव खेडेकर यांची लांबलेल्या पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया

मला माहिती होते की, पक्षप्रवेश होणार नाही. मात्र मोठ्या संख्येत लोक आले होते म्हणून मी त्यांना घेऊन आलो. काही लोक म्हणत होते की वैभव म्हणजे कोकण नव्हे. म्हणून मी कोण आहे हे दाखविण्यासाठी या लोकांना सोबत घेऊन आलो. मी भाजपाचे काम सुरू केले आहे. पक्ष प्रवेश ही फक्त औपचारिकता राहिली आहे. यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ठरले आणि रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. यानंतर लगेचच आम्ही भाजपाचे काम सुरू केले, असे वैभव खेडेकर यांनी सांगितले. 

माझा भाजपाप्रवेश होईल हे मात्र निश्चित आहे

भाजपामध्ये पक्षप्रवेश होऊ नये, यासाठी कुणी विरोध करत आहे का, या प्रश्नावर बोलताना वैभव खेडेकर यांनी सांगितले की, मी गल्लीतील कार्यकर्ता आहे. मी काही मोठा कार्यकर्ता नाही. मी २० वर्षे मनसेचे काम केले. यापेक्षा आता दुप्पट ताकदीने भाजपाचे काम करणार आहे. कोकणात कमळ फुलवण्याचे काम आम्ही करू. अनेक जिल्हाध्यक्ष तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांची यादी सोबत घेऊन आलो आहे, असे सांगून माझा भाजपाप्रवेश होईल हे मात्र निश्चित आहे, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी केला. दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेशाला आता नेमका कधी मुहूर्त मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.

 

टॅग्स :वैभव खेडेकरभाजपाकोकणराजकारणरत्नागिरीरायगड