Join us  

मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 3:34 PM

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. 

मुंबई - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर राज्यात संतापाचं वातावरण आहे. या लाठीमारासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, शिंदेंनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य केलं. आता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी, मराठा आरक्षण उपसमिती आणि वटहुकूम संदर्भात बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लक्ष्य केलं. त्यावरुन, आता विजय वडेट्टीवार यांनी सध्याच्या मंत्रीमंडळातील १८ मंत्री तेव्हाही मंत्री होते. त्यापैकी, ७ जण समितीत होते, असे सांगितले. 

विद्यमान मुख्यमंत्री जेव्हा सदस्य त्या समितीमध्ये सदस्य तेव्हा तोंड झाकलं होतं का, अशोक चव्हाणांसोबतचे १८ मंत्री आज तिकडे आहेत. त्या १८ मंत्र्यांपैकी ७ मंत्री समितीमध्ये होते. हे मंत्री काय करत होते, शेतातलं गवत उपटत होते काय? अशी सडेतोड प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच, आज खुर्चीवर बसल्यावर आपल्यावरची बला ढकलताय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, ठाण्याचे आणि पुण्याचे हे त्यावेळेस होते. २८ पैकी १८ मंत्री सत्तेत होते. त्यावेळी, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील तुमची भूमिका तुम्ही आक्रमकपणे का मांडली नाही. का माल लुटत होतात, जनतेला लुटत होतात, का मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करत होतात, अशी तीव्र शब्दात विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेवर पलटवार केला आहे. 

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढा. ओबीसींचे आरक्षण वाढवून द्या. आंदोलनस्थळी जाऊन मी हेच बोललो. ओबीसी समाजाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका आहे. जीव गेला तरी चालेल, पण ओबीसी कार्यकर्ता म्हणून ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

गळा घोटणारे हेच - मुख्यमंत्री शिंदे

अशोक चव्हाण हे तेव्हा उपसमितीचे अध्यक्ष होते. कितीवेळा गेले तिकडे, काल तिथे गेल्यावर मोठा गळा काढून ते बोलत होते. मराठा समाजाचा गळा घोटणारे तेच, आणि गळा काढायला गेले होते ते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, यापूर्वीच्या समितीमध्ये मी आणि अजित दादा हे केवळ सदस्य होतो, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवले.  

टॅग्स :विजय वडेट्टीवारमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेअशोक चव्हाणमराठा आरक्षण