"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:42 IST2025-10-28T14:41:09+5:302025-10-28T14:42:07+5:30
उत्तर भारतीयांनी एकत्रित येऊन समाजासाठी उभे राहिले पाहिजे. ज्या राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारण्याचं काम केले त्यांना कोर्टात खेचण्याचं काम मी केले आहे असं त्यांनी सांगितले.

"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद चिघळण्याची शक्यता आहे. छठपूजेनिमित्त जमलेल्या लोकांसमोर भाषण करताना उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जहरी टीका केली आहे. आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, जो सन्मान इथल्या लोकांना मिळतो तोच आम्हाला मिळायला हवा असं सांगत ईट का जबाब लोहे से देंगे असं विधान सुनील शुक्ला यांनी केले आहे.
उत्तर भारतीयांसमोर संबोधित करताना सुनील शुक्ला म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगा, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. आम्ही दोन तीन पिढ्यापासून इथे राहत आहोत. आम्ही सनातनी विचारधारेचे लोक आहोत. कुणी व्यक्ती उत्तर भारतीयांवर अत्याचार करतो, भाषेच्या नावाखाली मारहाण करतो तेव्हा एकच पर्याय समोर येतो, उत्तर भारतीयांनी एकत्रित येऊन समाजासाठी उभे राहिले पाहिजे. ज्या राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारण्याचं काम केले त्यांना कोर्टात खेचण्याचं काम मी केले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच त्यांचे वकील म्हणतात, शुक्ला तुम्ही खूप लवकर कोर्टात गेला. कमीत कमी २-३ हजार लोकांना मारणे हे त्यांचे टार्गेट होते. जर एकाही उत्तर भारतीयांना मारहाण होत असेल तर मनसेच्या कार्यकर्त्यांना कोर्टात खेचू आणि येताना ईट का जबाब लोहे से दुंगा..आम्ही भूमिपुत्र आहोत. या भूमीवर जो सन्मान सगळ्यांना मिळतो तो आम्हालाही मिळाला पाहिजे. आमच्या महिलांना कार्यालयात आणून त्यांना थप्पड मारली जाते. या लोकांच्या कार्यालयात घुसून एखादा उत्तर भारतीय जेव्हा त्यांना मारेल तर हा सुनील शुक्ला त्याच्यासोबत उभा राहील. त्याला संरक्षण आम्ही देऊ. १२८ वकील आमच्या पार्टीत आहेत असं चिथावणी देणारे विधानही सुनील शुक्ला यांनी केले.
मराठी बंटेगा, उत्तर भारतीय-गुजराती जुडेगा...
मराठी माणसे येत्या निवडणुकीत ५ पक्षात विभागली जातील. उत्तर भारतीय जो इथं पीडित आहे, आमचे शोषण होत आहे. आम्हाला दोन वेळचे जेवण मिळालं नाही तरी चालेल, भ्रष्टाचाराशी काही देणे घेणे नाही. रस्ते खराब असले तरी फरक नाही. परंतु आमच्या अस्मितेवर, मातेवर जर कुणी हात उचलत असेल तर त्याविरोधात आम्ही एकवटू त्यानंतर सत्तेत कुणी असेल ते पाहू. उत्तर भारतीयांचा महापौर मुंबईत बसवू. गुजराती समाज आणि आपण एकत्र आलो तर ५० टक्क्याहून जास्त होतो. त्यानंतर आपला महापौर इथे बसू शकतो असंही सुनील शुक्ला यांनी म्हटलं.