मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतरही भाजपा-शिवसेना यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाही. शिवसेनेने साद दिली तर भाजपाची दारं आजही खुली आहे या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे. आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधी पक्षाच्या अपेक्षा आहेत. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते. आता वेळ निघून गेली आहे. आम्ही पुढे आलो आहोत. विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करा. विरोधी पक्षाचा इतिहास पाहता काम चांगले करा असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच आमचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न भाजपाने केला. आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका. बाळासाहेबांचे विचार, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांचे विचार आम्हाला माहित आहे. बाळासाहेबांचे फोटो लावूनच भाजपा वाढली. आम्ही स्वतंत्र्यपणे लढलो असतो तर १०० च्या वर जागा जिंकल्या असत्या. जी भूमिका मिळाली आहे ती निभवा असा टोलाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
त्याचसोबत ऑटो रिक्षा असो वा बैलगाडी सरकार असो, राज्य सरकार चाललं आहे. बैलगाडीला कमी लेखू नका. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार कासवाच्या गतीने पुढे जाईल पण टप्पा पार करणार आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावरही टीका केली जाते, भारत ५ वर्षात उभा राहिला नाही तर गेल्या ६० वर्षापासून देशात काँग्रेसचं योगदान आहे. पंडित नेहरु, महात्मा गांधी, वीर सावरकर यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. कोणावरही टीका करुन आपण मोठे होत नाही असंही संजय राऊत यांनी सांगितले आहे.