दंडचुकार वाहनचालकांची खैर नाही, ५ वर्षांत मुंबईत ६६९ कोटींचे ई-चलन थकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:03 AM2024-02-27T10:03:50+5:302024-02-27T10:05:08+5:30

आरटीओही करणार कारवाई.

unpaid traffice fines in mumbai about 669 crore e-challans were exhausted in mumbai in 5 years | दंडचुकार वाहनचालकांची खैर नाही, ५ वर्षांत मुंबईत ६६९ कोटींचे ई-चलन थकले

दंडचुकार वाहनचालकांची खैर नाही, ५ वर्षांत मुंबईत ६६९ कोटींचे ई-चलन थकले

मनीषा म्हात्रे, मुंबई :  गेल्या पाच वर्षांत मुंबईत ६६९ कोटी ४२ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा ई चलनाची रक्कम थकीत असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे. वारंवार नोटीस बजावून देखील ई-चलन भरण्याकडे कानाडोळा करणाऱ्यांकडून दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांच्या दिमतीला प्रादेशिक परिवहन अधिकारीही (आरटीओ) कारवाईसाठी उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात आरटीओशी निगडित कुठलेही काम करण्यापूर्वी इ-चलनाची रक्कम पूर्ण भरणे आवश्यक असणार आहे. 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहनचालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये ई-चलान प्रणाली सुरू केली. वेगमर्यादा तपासणारे कॅमेरे बसविण्यात आले. त्याचप्रमाणे पावती पुस्तकाऐवजी पोलिसांच्या हाती मशिन्स देण्यात आली. या मशीनवर गाडीचा फोटो तसेच गाडी क्रमांक, परवाना क्रमांक आणि इतर माहिती टाकल्यावर ई-चलान तयार होते. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाकाच सुरू केला. 

वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच वर्षात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध २ कोटी ८६ लाख ११ हजार ४८५ ई चलन जारी केले. १ हजार २२३ कोटी ६ लाख ७८ हजार ५६२ रुपयांचा दंड 
ठोठावला आहे. 

म्हणून शासनाने घेतला निर्णय :

१)  वाहनांचे फिटनेस, हस्तांतरण, तारण ठेवण्याबाबतची कार्यवाही परिवहन विभागाकडून करण्यात येते. वाहतूक पोलिसांची यंत्रणा राष्ट्रीय पोर्टल (वाहन ४.०) शी संलग्न केलेली नाही. 

२) वाहतूक पोलिस विभागाने एनआयसीने विकसित केलेल्या प्रणालीचा वापर केल्यास वाहनांचे फिटनेस/हस्तांतरण/तारण ठेवण्याबाबतची कार्यवाही करताना पोलिस, वाहतूक विभागाकडून वाहन नियमांचा उल्लंघन केलेल्या वाहनांना जारी केलेल्या ई-चलनाची प्रलंबित रक्कम वसूल करता येईल. 

३)  त्यासाठी ई-चलन संदर्भात वाहतूक पोलिस विभागाकडे असलेला सर्व माहिती हा एनआयसी यांच्या (वाहन) या पोर्टलवर स्थलांतरित करणेदेखील आवश्यक आहे. याबाबतची कार्यवाही व समन्वय करणे यादृष्टीने समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

४)  आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४४ हजार ७७८ ई चलनाची ५५३ कोटी ६३ लाख ९५ हजार ६६२ रुपयांची वसुली केली आहे. 

५)  यामध्ये गेल्या वर्षी १४८ कोटी ९९ हजार ६१ हजार ३०० रुपयांचा समावेश आहे. दुसरीकडे वसुलीपेक्षा  थकीत रकमेचा आकडा जास्त आहे. 

६) त्यामध्ये  १ कोटी ४२ लाख ६६ हजार ७०४ ई-चलनाची  ६६९ कोटी ४२ लाख ८२ हजार ९०० रुपयांची रक्कम प्रलंबित आहे.

अन् समितीची नियुक्ती :

१) शासनाने पोलिस (वाहतूक) विभागाने जारी केलेल्या प्रलंबित ई-चलनची वसुली करण्यासाठी उपाययोजना सुचविणे तसेच याबाबतची कार्यवाही व समन्वय करण्यासाठी समितीची नियुक्ती केली. 

२) या समितीत राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक अध्यक्ष असणार आहे. तसेच सह परिवहन आयुक्त (संगणक) हे सदस्य तर राज्य माहिती अधिकारी, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हे सदस्य सचिव असणार आहे. ई-चलन संदर्भात वाहतूक पोलिस विभागाकडे असलेली सर्व माहिती (डेटा) हा दिनांक ३१ मार्चपूर्वी एनआयसी यांच्या (वाहन) पोर्टलवर स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याबाबतचे आदेश गृहविभागाने नुकतेच जारी केले आहे.

३) ई- चलन कारवाईनंतर दंड वसुलीसाठी ६ महिन्याने कायदेशीर प्रक्रियेद्वारे पाठपुरावा होतो. मात्र बरेच जण त्याकडेही दुर्लक्ष करतात. तसेच थकित ई-चलन असलेला वाहन चालक पुन्हा वाहतूक पोलिसांच्या समोर येईलच असे नाही, मात्र आरटीओकडे त्याचे येणे नेहमीचे असते. अशा चालकांकडून दंड वसुलीसाठी आरटीओची मदत घेण्यात येणार आहे. जेणेकरून थकीत ई-चलन चालकाचे आरटीओशी निगडित कामासाठी जाताच तेथे दंड वसूल केल्याशिवाय कामे होणार नाही.- एम. रामकुमार, अपर पोलिस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलिस

Web Title: unpaid traffice fines in mumbai about 669 crore e-challans were exhausted in mumbai in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.