University consolation to graduate students | पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा

पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा

मुंबई : तीन दिवसांपासून झालेली अतिवृष्टी व वादळी वार्‍यामुळे निर्माण झालेली इंटरनेट व विजेच्या समस्येमुळे अनेक विद्यार्थ्यांना पदवी प्रथम प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणे शक्य झाले नाही. पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही मुंबईविद्यापीठाने नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ७ ऑगस्टपासून १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठाने २१ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत नोंदणी प्रक्रिया राबवली होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये इंटरनेट व वीज सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर प्रवेश नोंदणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने www.mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ७ ऑगस्टपासून पुन्हा प्रवेश नोंदणी लिंक खुली करण्यात आली आहे. ही लिंक १४ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली असणार आहे.

७ ते १४ ऑगस्टदरम्यान प्रवेश नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादीत समाविष्ट क्जरून प्रवेश द्यावा अशा सूचना महाविद्यालयांना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांनाही ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्या महाविद्यालयाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सूचना मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सर्व संलग्नित कॉलेजांना दिल्या आहेत.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: University consolation to graduate students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.