“PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली”: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:39 IST2025-05-27T15:39:26+5:302025-05-27T15:39:55+5:30
Amit Shah Mumbai Tour: राम मंदिर, काशी विश्वेश्वर कॉरिडॉर हा देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. एक चिमूटभर सिंदूरचे महत्त्व आपण जगाला दाखवले. हे सगळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शक्य झाले, असे अमित शाह यांनी मुंबईत म्हटले आहे.

“PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली”: अमित शाह
Amit Shah Mumbai Tour: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. मुंबईत अनेक कार्यक्रमांना अमित शाह उपस्थित राहणार होते. परंतु, मुंबईतील पावसाची बॅटिंग आणि दिल्लीतील एका महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे अमित शाह यांनी मुंबई दौरा आटोपता घेतला. परंतु, माधवबाग येथील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या १५० व्या उत्सवाच्या कार्यक्रमाला अमित शाह आवर्जून उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह यांनी विविध विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
अमित शाह म्हणाले की, अनेकांना माहिती नसेल माझा जन्म मुंबईचा आहे. मी या मंदिरात अनेकदा आरतीसाठी यायचो. त्यावेळी या ठिकाणी एक हॉल होता. कमी पैशात लग्न लावले जात होते. संस्था मदत करत होती. या ठिकाणी अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम होत होते. इंग्रजांचे सरकार असताना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी धार्मिक संस्था उभ्या करणे सोपे नव्हते. १५० वर्ष एक संस्था चालवणे सोपे नाही. मी जुन्या संस्था चालवल्या आहेत. माधवबागच्या ट्रस्टींचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले.
PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली
काही जण म्हणतात की, पंतप्रधान मोदी यांनी काय केले? पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणली आहे. आगामी काही काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाईल. २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय असल्याचा अभिमान आहे. आपली सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण सडेतोड उत्तर दिले. आपली सुरक्षा आता भक्कम झाली आहे, असे अमित शाह यांनी नमूद केले.
दरम्यान, मला फ्रेंच डिप्लोमेट भेटले होते. मी त्यांना विचारले की, १० वर्षांत भारतात काय बदलले, असे तुम्हाला वाटते. ते मला म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारतीय पासपोर्टची किंमत वाढवली. कोणत्याही देशात जा, आपले हसतमुखाने स्वागत केले जाते. राम मंदिराचे संकल्प प्रत्यक्षात आला. काशी विश्वेश्वर कॉरिडोर बनवले. भारतीय योग आणि आयुर्वेद जगभरात नेले. हे सगळे परिवर्तन मोदींनी केले. देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून एक चिमूटभर सिंदूरचे, कुंकवाचे महत्त्व सगळ्या जगाला दाखवले, सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला. १० कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. तरीही अजून सिंदूरचे महत्त्व त्या लोकांना समजलेले नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली.