"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:18 IST2025-10-28T06:02:13+5:302025-10-28T08:18:56+5:30
डबल नाही, ट्रिपल इंजिन सरकार हवे; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधकांचा सफाया करा

"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
मुंबई : महाराष्ट्रात आज डबल इंजिनचे सरकार आहे. केंद्र, राज्यात आपली सत्ता आहे. त्याने आपण समाधानी असाल; पण, मी नाही. आता प्रचंड मेहनत करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सफाया करून ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्रात आणावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथे केले.
महाराष्ट्रातील भाजप कोणाच्या कुबड्यांवर चालत नाही, असे विधान शाह यांनी यावेळी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मित्रपक्षांना त्यांचा यातून काही इशारा होता का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली, पण ‘मित्र हे कधीही कुबड्या नसतात’, शाह यांच्या या विधानावर जे प्रतिक्रिया देत आहेत त्यांना कुबड्यांचा अर्थच न कळल्याने त्यांची आजची अवस्था झाली आहे, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर माध्यमांशी बोलताना काढला.
चर्चगेटजवळ भाजपच्या भव्य प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन शाह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शाह म्हणाले की, निवडणुकीच्या निकालात विरोधक दुर्बिणीनेही दिसणार नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली पाहिजे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते.
फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४ पासून विधानसभेत आपण विजय मिळवत आलो आहोत. २०१४ मध्ये युतीचे प्रयत्न आपण केले, पण युती तुटली आणि भाजपचा पहिला मुख्यमंत्री आपण केला. आता महापालिकांपासून पंचायत समित्यांपर्यंतच्या संस्था जिंकून ट्रिपल इंजिन सरकार आणायचे आहे.
असे असेल नवे कार्यालय
५५ हजार चौरस फूट जागेवर भव्य कार्यालय
०६ बैठक कक्ष
४०० क्षमतेचे सभागृह
प्रदेशाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचेही कार्यालय.
बहुमजली पार्किंग, वैद्यकीय केंद्र, बाहेरून आलल्या पदाधिकाऱ्यांच्या निवासाची सोय.
भाजपने देशात जसे स्वत:चे अस्तित्व आणि तत्त्वाधिष्ठित राजकारणाने अमीट छाप सोडली आहे, तसेच महाराष्ट्रातही आहे, इथे भाजप कोणाच्या कुबड्यांवर चालत नाही. स्वबळावर उभा आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, सर्व माजी प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री